लोकसभा निवडणुकीत काही धक्कादायक निकाल लागले असून यामधील सर्वात जास्त आश्चर्यकारक आणि अनपेक्षित निकाल म्हणजे राजू शेट्टींचा पराभव. मतमोजणी सुरु होण्यापूर्वीच राजू शेट्टी यांचा विजय नक्की मानला जात होता. मात्र शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींचा दणदणीत पराभव केला. एक लाखाच्या मताधिक्याने धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींचा पराभव करत विजय मिळवला. दरम्यान राजू शेट्टी यांनी पराभव होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं अशी प्रतिक्रिया दिली आहे.

लोकांना माझ्यापेक्षा चांगला खसादार हवा असं वाटलं असेल तर तो निर्णय स्विकारला पाहिजे असं सांगत राजू शेट्टी यांनी मतदारांचा कौल मान्य केला. यापुढे शेतकरी चळवळीत वेगळ्या पद्धतीने काम करत राहीन असंही त्यांनी सांगितलं. आधी दिल्लीत जाऊन शेतकऱ्यांची बाजू मांडायचो. पण आता रस्त्यावरची लढाई करत किंवा अन्य मार्गाने शेतकऱ्यांसाठी काम करु असं राजू शेट्टींनी म्हटलं आहे.

नरेंद्र मोदींविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे पराभव झाला का असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, ‘नरेंद्र मोदींविरोधात भूमिका घेतली होती. घेतली नसती तर अंतर्मनाने साथ दिली नसती. त्यांनी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्या होत्या. यासाठी मोदी सरकारने घेतलेलं शेतकऱ्यांचं धोरण जबाबदार आहे. सरकराला शेतकऱ्यांसाठी काही देणं घेणं नाही. म्हणून मी विरोधी भूमिका घेतली. याच प्रश्नावर सरकार निरुत्तर होत होते. यामुळे मी विरोधात घेतलेली भूमिका त्यांच्या नेत्यांना हे रुचलं नसावं’.

यावेळी राजू शेट्टी यांनी भाजपा कार्यकर्त्यांनी विषारी प्रचार केला असा आरोप केला. जहाल जातीविरोधी प्रचार करण्यात आला. शेतकरी भावनिक असतो, धार्मिक असतो त्याला तो बळी पडतो असंही ते म्हणाले. गेल्या काही काळापासून वांशिक, जातीचे भावनिक मुद्दे उपस्थित करुन लोकांना भडकवून राजकारण केलं जात होतं आणि हे चुकीचं आहे असंही त्यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांवर माझा प्रचंड विश्वास होता. शेतीशी संबंध नसणारे पण स्वच्छ राजकारणी असवेत असं वाटणारेही अनेकजण होते त्यांचा मला पाठिंबा होता. शेतमजूर, फेरीवाले मला मदत करायचे असं सांगताना मोदी फिव्हरचा खूप मोठा परिणाम झाला असंही त्यांनी मान्य केलं.

सुरुवातीला भाजपासोबत आघाडी करण्यासंबंधी सांगताना राजू शेट्टींनी म्हटलं की, ‘मी आघाडी केली होती हे नाकारत नाही. त्यावेळी नरेंद्र विकासपुरुष आहे, विकास करेल असं वाटलं होतं. अहमदाबादला जाऊन भेटलोदेखील होतो. तुमचे निवडणुकीचे मुद्दे काय आहेत हे मी विचारले होते. त्यांनी गरिबी, विकास या मुद्द्यावंर निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं होतं. पण एक ते दीड वर्षात त्यांनी खरा चेहरा दाखवला म्हणून विरोध केला’. मोदी सरकारविरोधात भूमिका घेतल्याचा पश्चाचाप वाटत नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

मी माझ्या विचारांची कास सोडणार नाही. यांचं नमोहरण केल्याशिवाय सोडणार नाही असा निर्धार यावेळी त्यांनी बोलून दाखवला. वंचित बहुजन आघाडीमुळे आठ ते नऊ ठिकाणी पराभव झाला हे स्पष्ट आहे. आपण काय साध्य केलं याचा त्यांनी विचार करावा. आपण एकटे एकटे लढू लागलो तर यांचा उन्माद वाढल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी म्हटलं.

‘माझं काम माझ्या पद्धतीने करत राहणार आहे. लोकप्रतिनिधी असताना काम करणं सोपं जात. हा शेतकऱ्यांनी घेतलेला निर्णय आहे. मी माझ्या परीने शक्य तितकं योगदान देईल. राष्ट्रीय स्तरावर जी एकजूट केली आहे ती काही तुटणार नाही. भविष्यात शेतकऱ्यांना मदतीची गरज लागणार आहे. दुष्काळ असताना त्यावर चर्चा झाली नाही तरी उमेदवार जिंकले याचं आश्चर्य वाटतं. शेतकऱ्यांची मला कीव येते’, असंही ते म्हणाले.

‘गेली १५ वर्ष मी सातत्याने जिंकत होतो. ठेच लागली म्हणून बोट तोडायचं नसतं. आपली संघटना मजबूत करायची आहे. दुसरे काय म्हणतात यापेक्षा आपल्याला काय वाटतं महत्त्वाचं आहे. काही शेतकऱ्यांना मुद्दे समजले नसावेत, त्यांना बदल करुन पहावा असं वाटलं असावं. शेतकऱ्याला आधाराची गरज असून आपण ती दिली नाही तर त्यांना वाईट वाटेल’, असा संदेश यावेळी राजू शेट्टी यांना कार्यकर्त्यांना दिली आहे.