दयानंद लिपारे

धनंजय महाडिक, संजय मंडलिक, धैर्यशील मानेंची निवासस्थाने

कोल्हापूर जिल्ह्यत लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला असताना शहरातील एका भागात मात्र अहोरात्र घडामोडी अव्याहतपणे सुरु आहेत. दोन्ही मतदारसंघातील प्रचाराची सारी सूत्रे येथूनच हालत आहेत. रुईकर कॉलनी हा तो भाग. याच कॉलनीत कोल्हापूर मधील दोन प्रमुख आणि हातकणंगले मधील एका प्रमुख उमेदवाराचे निवासस्थान आहे. खासदार धनंजय महाडिक, शिवसेनेचे संजय मंडलिक आणि शिवसेनेचेच धैर्यशील माने या रुईकर कॉलनीतील तिघांच्या राजकीय भाग्योदयाचा फैसला या निवडणुकीत लागणार आहे. याशिवाय, राजकारणातील अन्य काही प्रमुखांचे निवासस्थान याच भागात असल्याने राजकीय घुसळण वाढली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यच्या राजकारणात काही भागांना विशेष महत्त्व मिळत आले आहे. दोन दशकापूर्वी दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यातील संघर्ष उफाळला होता तेव्हा कागल तालुका लक्षवेधी ठरला होता. राजकारणाचे विद्यपीठ अशी कागलला उपाधी बहाल करण्यात आली.

कोल्हापुरातील शिवाजी पेठ, काही तालीम मंडळे येथील राजकीय खलबते महत्त्वाची मानली जातात. पण, लोकसभा निवडणुकीवेळी मात्र शहरातील प्रतिष्ठितांची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रुईकर कॉलनीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाल्याचे गेल्या दोन दशकाहून अधिक काळ दिसत आले आहे.

जनता दलाचे दिवंगत आमदार रविंद्र सबनीस, दादासाहेब रुईकर प्रभृतींनी १९४६ साली कोल्हापूर-सांगली मार्गावर कावळा नाक्याच्या (ताराराणी पुतळा) पुढे ही वसाहत स्थापन केली, असे कॉलनीचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी सांगितले.

प्रारंभी येथे बव्हंशी गूळ व अन्य व्यापारी यांचे अधिक्य होते. नंतरच्या काळात राजकारणातील मातब्बरांचे वास्तव आणि महत्त्वही वाढू लागले. ज्येष्ठ नेते, माजी सहकार मंत्री प्रा. डॉ. एन. डी. पाटील, दिवंगत मंत्री बाळासाहेब देसाई, दिवंगत खासदार बाळासाहेब माने, सदाशिवराव मंडलिक, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे आदींचे निवासस्थान याच भागात आहे.

विजयाचा गुलाल रुईकर कॉलनीलाच

यंदाच्या निवडणुकीत दोन्ही मतदारसंघातील प्रमुख तीन उमेदवार रुईकर कॉलनीतील आहेत. खासदार धनंजय महाडिक, शिवसेनेचे संजय मंडलिक आणि हातकणंगले मधील शिवसेनेचे धैर्यशील माने हे तिघेही इथलेच. कोल्हापूरचा निकाल कसाही लागला तरी विजयाचा गुलाल या रुईकर कॉलनीतच उधळला जाणार हे निश्चित. हातकणंगले बाबतीत वेगळ्या अर्थाने असेच साधम्र्य दिसून येते. धैर्यशील माने याच वसाहतीमधील, तर राजू शेट्टी यांच्या प्रचाराची धुरा वाहणारे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश आवाडे यांचेही निवासस्थान याच भागातील. म्हणजे हातकणंगलेच्या विजयाचा जल्लोष याच रुईकर कॉलनीत २४ मे  रोजी पाहायला मिळणार यात संदेह नाही. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे पंचतारांकित हॉटेलही याच वसाहतीला लागून असल्याने त्यांची राजकीय नजर येथे खिळून न राहिली तर नवल.

सहाही उमेदवार कॉलनीतीलच

दहा वर्षांपूर्वीची निवडणूक तर आणखी वेगळी ठरली होती. तेव्हा, कोल्हापूर मतदारसंघातील सदाशिवराव मंडलिक, धनंजय महाडिक आणि बसपचे बाबासाहेब वाघ आणि हातकणंगले मधील निवेदिता माने, सेनेचे संजय पाटील व बसपचे य. गो. कांबळे असे सहाही उमेदवार रुईकर कॉलनीमधील होते. याबाबत येथील रहिवासी राजेश नाईक यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना एक वैशिष्टय़ नमूद केले. ते म्हणाले,की सहाही उमेदवार आमच्याच पिठाच्या गिरणीचे ग्राहक होते. प्रमुख उमेदवार या भागातील असतानाही येथील शांतता अबाधित राहिली.