कोलकाता येथील रोड शोदरम्यान सीआरपीएफचे जवान नसते तर मी तिथून जिवंत बाहेर पडू शकलो नसतो, मी तिथून सुखरुप निघू शकलो, हे माझे नशीबच आहे, असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी म्हटले आहे. रोड शोदरम्यान एक नव्हे तर तीन वेळा हल्ला झाला, तिसऱ्या हल्ल्यात जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली आणि रॉकेल भरलेल्या बॉटलही फेकण्यात आल्या, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी कोलकात्यात काढलेल्या ‘प्रचार मोर्चा’ला हिंसक वळण लागले. या हिंसाचारात भाजपा आणि तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक झाली. वातावरण चिघळताच शहा यांना हा मोर्चा आटोपता घ्यावा लागला.

लोकसभा निवडणुकीतील सहा टप्प्यांमधील मतदान झाले असून यात पश्चिम बंगाल वगळता अन्य कुठेही हिंसाचाराची घटना घडली नाही. मी ममताजींना चांगलं ओळखतो. तुम्ही फक्त 42 जागांवर निवडणूक लढवत आहात आणि भाजपा देशभरात निवडणूक लढवत आहात. फक्त पश्चिम बंगालमध्येच हिंसाचार होत असून यावरुन हिंसाचारामागे फक्त तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचे स्पष्ट होते, असा दावा अमित शाह यांनी केला.

कोलकात्यात माझ्या रोड शोपूर्वी भाजपाचे पोस्टर्स फाडण्यात आले. रोड शोमध्ये लक्षणीय गर्दी झाली होती. अडीच तास रोड शो शांततामय मार्गाने सुरु होता, यानंतर रोड शोवर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. कोलकाता विद्यापीठाच्या आवारात काही विद्यार्थी धुडगूस घालणार, अशी चर्चा होती. पण पोलिसांनी या विद्यार्थ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही, असा आरोपही त्यांनी केला,