शहरात ‘शत प्रतिशत भाजप’; पण मतदानात मात्र वाढ नाही

पुणे लोकसभा मतदार संघांतर्गत येत असलेल्या सहाही मतदार संघात आमदार, एक खासदार, दोन मंत्री, एक केंद्रीय मंत्री, महापालिकेत तब्बल ९८ नगरसेवक अशी ‘शत प्रतिशत’ ताकद असल्यामुळे पुण्यातील सहाही विधानसभा मतदार संघातील मतदानाची टक्केवारी वाढेल, असे वाटत असतानाच मतदानाची टक्केवारी मात्र जेमतेमच राहिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे कोथरूड, शिवाजीनगर, पर्वती या विधानसभा मतदार संघांबरोबरच पालकमंत्री आणि युतीचे उमेदवार गिरीश बापट यांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदार संघातही गेल्या निवडणुकीपेक्षा कमी मतदान झाले.

सन २०१४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष-शिवसेनेची युती होती. त्या वेळी वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ या सहा मतदार संघातून मोठे मतदान झाले होते. कसबा पेठ विधानसभा मतदार संघ मतदानाच्या टक्केवारीमध्ये अव्वल होता. या वेळीही निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युती असताना युतीचे वर्चस्व असलेल्या शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती आणि कसब्यातील मतदानाचे प्रमाण मात्र घसरल्याचे दिसून आले आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर झालेली महापलिकेची निवडणूक भाजपकडून स्वबळावर लढविली गेली आणि त्या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपची ताकद वाढल्याचे दिसून आले होते.

पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ

पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये २०१४ पूर्वी भारतीय जनता पक्षाचा एकही नगरसेवक नव्हता. ही संख्या आता पाच आहे. तर महापालिकेतील नगरसेवकांची संख्या १३ आहे.

पाच वर्षांत भाजपची ताकद वाढलेली असतानाही मतदानाची टक्केवारी वाढू शकलेली नाही. या मतदार संघात ४८.७९ टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीपेक्षा मतदान तीन टक्के कमी झाले असून मतदानाच्या टक्केवारीत हा मतदारसंघ चौथ्या क्रमांकावर राहिला आहे. काँग्रेसची या मतदार संघात मोठी ताकद आहे.

वडगावशेरी मतदारसंघ

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या वडगावशेरी विधानसभा मतदार संघात २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी झाला.

त्यानंतर या मतदार संघात भाजपचे १२, शिवसेनेचे तीन आणि रिपाइंचे दोन अशी नगरसेवकांची ताकद आहे. रिपाइं आणि शिवसेनेचेही काही प्रभागात वर्चस्व असल्यामुळे या मतदारसंघात चांगले मतदान होईल, असे वाटत असतानाच हा मतदार संघ टक्केवारीमध्ये तळाला गेला आहे. गेल्यावेळीपेक्षा येथे मतदान चार टक्क्य़ांनी कमी झाले.

कोथरूड मतदारसंघ

कोथरूड विधानसभा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. शिवसेनेचीही या मतदार संघात ताकद आहे. विधानसभा निवडणूक स्वबळावर लढल्यानंतर या मतदार संघातून भाजपला विजय मिळाला. कोथरूड विधानसभा मतदार संघात २२ नगरसेवक भाजपचे असून एक नगरसेवक शिवसेनेचा आहे. असे असले तरी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत येथे मतदानाचे प्रमाण पाच टक्क्य़ांनी कमी झाले आहे. गेल्या वेळी विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना या भागातून मोठे मतदान झाले होते. यंदा मात्र मतदानाची टक्केवारी कशीबशी ५० टक्क्य़ांपर्यंत पोहोचली. भक्कम संघटन असतानाही मतदानाची टक्केवारी वाढविण्यात अपयश आल्याचे दिसून येत आहे.

कसबा मतदारसंघ

कसबा मतदार संघातून लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट या मतदार संघातून पाच वेळा मोठय़ा मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. त्यामुळे कसबा मतदार संघातून चांगले मतदान होईल, अशी शक्यता होती. या मतदार संघात भाजपचे १६ नगरसेवक असून दोन नगरसेवक शिवसेनेचे आहेत. त्यामुळे युतीची ताकद या मतदार संघात आहे. पण याही मतदार संघात या वेळी मतदानाचे प्रमाण सात टक्क्य़ांनी घटले आहे. शहरातील सहा मतदार संघाच्या तुलनेत कसबा पेठेतील मतदान वाढले असले तरी गेल्या निवडणुकीपेक्षा ते कमी आहे. कसबा पेठेतील मतदानाची टक्केवारी ५५.८८ टक्के राहिली.

पर्वती मतदारसंघ

पर्वती विधानसभा मतदार संघातील नगरसेवकांची संख्या २७ आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे २३ नगरसेवक आहेत, तर शिवसेनेचा एक नगरसेवक आहे. महापालिका निवडणुकीत पर्वतीमधून भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून गेले होते. संघटनात्मक बांधणीमुळे यापूर्वी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही येथे मतदान वाढले होते. आता मात्र पर्वती विधानसभा मतदार संघात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानात दोन टक्क्य़ांनी घट झाली आहे. तेथे यंदा ५२.०७ टक्के मतदान झाले.

शिवाजीनगर मतदारसंघ

शिवाजीनगर मतदार संघात महापालिकेच्या तीन प्रभागांचा समावेश आहे. त्यामध्ये बारापैकी बारा नगरसेवक भाजपचे आहेत. महापालिकेतील सर्व नगरसेवक, एक आमदार असतानाही लोकसभा निवडणुकीतील मतदान सात टक्क्य़ांनी खाली आले आहे. या मतदारसंघात भाजपची बूथ यंत्रणा अधिक सक्षम आहे. त्यामुळे येथे महापालिका निवडणुकीत चांगले यश मिळाले होते. मात्र मतदारसंघाच्या टक्केवारीत हा मतदारसंघ पाचव्या क्रमांकावर गेला आहे.