सरकारवर खुलेपणानं टीका करणारे आणि समाजातील प्रत्येक गंभीर प्रश्नावर बेधडकपणे आपलं मत मांडणारे अभिनेते प्रकाश राज राजकारणाच्या आखाड्यात उतरले खरे पण लोकसभा निवडणुकीत ते पराभवाच्या मार्गावर आहेत. कर्नाटकातील बेंगळुरू मध्य मतदारसंघातून ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. प्रकाश राज यांना जवळपास १३ हजार मतं मिळाली असून या मतदारसंघातून काँग्रेसचे रिझवान अर्शद आघाडीवर आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकाश राज यांनी ट्विट केलं आहे. ‘माझ्या चेहऱ्यावर ही सणसणीत चपराक आहे,’ असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

‘माझ्या गालावर ही सणसणीत चपराक आहे. जितका अपमान, ट्रोलिंग आणि अपशब्द माझ्या वाट्याला येतील.. मी तितकाच धर्मनिरपेक्ष भारतासाठीचा माझा लढा सुरू ठेवीन. पुढील कठीण प्रवासाला आता फक्त सुरुवात झाली आहे. या प्रवासात मला पाठिंबा देणाऱ्यांचे खूप खूप आभार,’ असं ट्विट त्यांनी केलं आहे.

काँग्रेसचे उमेदवार रिझवान अर्शद यांच्या तुलनेत प्रकाश राज यांना अत्यंत कमी मतं मिळाली आहेत. तामिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या प्रकाश राज यांनी भाजपा किंवा काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष नसल्याचं म्हटलं होतं. त्याऐवजी त्यांनी आम आदमी पार्टी आणि कन्हैय्या कुमार यांच्यासाठी प्रचार केला होता.

गेल्या वर्षभरात मोदी आणि भाजप सरकावर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली. इतकंच नाही तर मी भाजपवर टीका करतो म्हणून मला कोणी काम देत नाही असंही ते म्हणाले होते. कलाकारांची आणि विचारवंताची समाजात होणाऱ्या गळचेपीवरही त्यांनी मोदी सरकारवर कडाडून टिका केली होती.