नागपूर : २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेमध्ये लाखोंची आघाडी घेऊन विजयी झालेले युतीचे विदर्भातील खासदार यावेळी पुन्हा मोदी लाट असतानाही जुने मताधिक्य कायम ठेवू शकले नाहीत. याला फक्त अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रे, भावना गवळी हे अपवाद ठरले. त्यांनी २०१४ चा विक्रम मोडला.

२०१४ च्या निवडणुकीत भाजप-सेना युतीने विदर्भातील सर्व दहा जागा प्रचंड मताधिक्यानेजिंकल्या होत्या. सर्वाधिक मताधिक्य (२ लाख ८४ हजार) नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तर सर्वात कमी मताधिक्य (९३ हजार) यवतमाळच्या सेनेच्या खासदार भावना गवळी यांना मिळाले होते. २०१९ मध्ये मोदी लाट कायम असल्याचे निवडणूक निकालातून दिसून येत असले तरी युतीने दोन जागा गमावल्या व विजयी उमेदवारांच्या मताधिक्क्यातही घट झाली.

२०१४ मध्ये नागपूर मतदारसंघात नितीन गडकरी यांचे मताधिक्य २.८४ हजार होते. २०१९ मध्ये बाराव्या फेरीअखेर त्यांचे मताधिक्य १ लाख ९५ हजारापर्यंतच गेले होते. रामटेकमध्ये शिवसेनेचे कृपाल तुमाने यांचे गेल्या निवडणुकीतील मताधिक्य १.७५ लाख होते यंदा त्यांचे मताधिक्य निम्म्यावर म्हणजे ७७ हजारावर आले. वर्धा मतदारसंघात रामदास तडस यांचे मताधिक्य २.१५ लाखावरून १.६४ लाख, गडचिरोलीमध्ये भाजपचे अशोक नेते यांचे मताधिक्य २.३६ लाखांवरून ७७ हजारावर आले. बुलढाण्यात सेनेचे प्रतापराव जाधव यांचे मताधिक्य १ लाख ५९ हजार वरून १.३० लाखावर आले.

२०१४ मध्ये अमरावतीतून सेनेचे आनंदराव अडसूळ हे २ लाख ३१६ मतांनी विजयी झाले होते. यावेळी ते पराभवाच्या छायेत आहेत. असेच चित्र चंद्रपुरात देखील आहे. चंद्रपूरमधून भाजपचे हंसराज अहीर यांनी  २.३६ लाख मतांनी विजयश्री प्राप्त केली होती. यंदा ते पराभूत झाले.

धोत्रे, गवळी अपवाद

युतीच्या काही विजयी उमेदवारांचे मताधिक्य मात्र गतवेळेपेक्षा वाढले आहे. यवतमाळ -वाशीमच्या सेनेच्या खासदार भावना गवळी यांचे मताधिक्य ९३ हजार ८१६ वरून सव्वा लाखावर, अकोल्यातील भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांचे मताधिक्य २ लाखांवरून २.७० लाखांवर गेले. २०१४ मध्ये भंडारा-गोंदिया येथून भाजपचे नाना पटोले १.४९ लाखांनी विजयी झाले होते. यंदा येथून भाजपचे सुनील मेंढे यांचे मताधिक्य १.९० लाख इतके आहे.