महिलांचा लक्षणीय सहभाग; प्रचारकांमध्ये नागरी कर्तव्याचेही भान

उमेदवाराबरोबर एक दिवस

प्रथमेश गोडबोले, पुणे</strong>

लष्कर भागातील जे. जे. गार्डनचा परिसर. सकाळी साडेनऊपासूनच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. थोडय़ाच वेळात काँग्रेसचे पुणे लोकसभेचे उमेदवार मोहन जोशी ऊर्फ दादा यांचे आगमन होते. प्रचारासाठी तयार केलेली उघडी जीप तयार असते. रोज रात्री उशिरापर्यंत प्रचार सुरू असल्याने दादांचा चेहरा चांगलाच ओढावल्याचे जाणवते. मात्र, सर्व कार्यकर्त्यांच्या घोषणांनी दादाही उत्साहात जीपमध्ये उभे राहतात. दादांच्या उत्साहाला कार्यकर्त्यांची विशेष साथ मिळते आणि जोरदार घोषणांनी दहाच्या सुमारास प्रचाराला सुरुवात होते.

दादांना साथ करायला शहराध्यक्ष रमेश बागवेही उपस्थित असतात. सबकी खुशी मोहन जोशी, मोहनदादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, पुणे की खुशी मोहन जोशी, चौकीदार चोर है, आदी घोषणांनी परिसर दुमदुमुन जातो. कार्यकर्त्यांमध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग पाहून लष्कर भागातील नागरिकही अवाक होतात. लष्कर परिसरातून दादांची फेरी सुरू असतानाच स्वारगेट परिसरातून महिलांची दुचाकी रॅली सुरू झालेली असते. सेंटर स्ट्रीट, भोपळे चौक, जाफरिन लाइन, भीमपुरा, पुलगेट पोलीस चौकी अशी दरमजल करत फेरी पुढे सरकत असते.

काँग्रेसचे स्थानिक आणि फेरीमधील काही कार्यकर्ते फेरीच्या पुढे जाऊन दादांच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी करतात. फेरीमध्ये सहभागी झालेल्यांचा उत्साह दुणावतो आणि पुन्हा घोषणा सुरू होतात. आबेदा इनामदार महाविद्यालयापाशी आल्यानंतर दादा फ्रेश होण्यासाठी जातात. प्रचाराच्या रिक्षातून कार्यकर्त्यांमधील एकाकडून साडेबाराच्या सुमारास फेरीची सांगता झाल्याची घोषणा ध्वनिक्षेपकावरून होते. कार्यकर्त्यांना सरबत आणि समोसे दिले जातात. दादाही कार्यकर्त्यांना जेवण करून घेण्याचे फर्मावतात आणि आपल्या चारचाकीतून मार्गस्थ होतात.

दुपारी जेवण, थोडी उसंत, कार्यकर्त्यांबरोबर प्रचाराची आखणी, गप्पा झाल्यानंतर पर्वती भागात दादा प्रचारासाठी निघतात. तेथून पुन्हा ते पर्वती मतदार संघात प्रचारासाठी पोहोचतात. व्हीआयटी महाविद्यालय,अंबिकानगर, बिबवेवाडी, गंगाधाम, आंबेडकर नगरमार्गे ऋतुराज सोसायटी या भागातून फेरी होते. अ‍ॅड. अभय छाजेड, माजी उपमहापौर आबा बागुल इथे दादांच्या बरोबर होते. ‘पंतप्रधान मोदी यांच्या कार्यपद्धतीमुळे भाजपची ब्रॅण्ड व्हॅल्यू कमी झाली. भाजपशी आमचे वैचारिक मतभेद असले, तरी भाजपा हा भारतीय राजकारणातील महत्त्वाचा पक्ष होता. आता नाही,’ अशी टीका दादा फेरीच्या समारोप प्रसंगी करतात.

रुग्णवाहिकेला जागा

पुलगेट पोलीस चौकी रस्त्यावर दादांची प्रचारफेरी आल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून फेरीचे स्वागत केले. सर्वाना अभिवादन करत दादांची जीपही काही काळ तेथेच स्थिरावली. रस्त्यावर वाहनांची संख्याही मोठी होती. तेवढय़ात पुलगेटकडून एक रुग्णवाहिका पुलगेट पोलीस चौकीच्या दिशेने आली. दादांच्या कार्यकर्त्यांनी ताबडतोब रुग्णवाहिकेला जागा करून दिली आणि ती पुढे मार्गस्थ झाली.