पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी २६ एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. मात्र, भाजपाच्या एका नेत्याने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषद घेणार नसून ही ११० टक्के अफवाच आहे असे सांगितले.इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना भाजपा नेते म्हणाले की, २६ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये पत्रकार परिषद घेणार नाहीत. पंतप्रधान पत्रकार परिषद घेणार असल्याच्या ११० टक्के अफवाच आहेत. भविष्यातही ते पत्रकार परिषद घेण्याची कोणतीही योजना नाही.

२६ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमधून लोकसभासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळी ते पत्रकार परिषद घेणार असल्याची चर्चा बुधवारी सोशल मीडियावर सुरू होती. सत्तेत आल्यानंतर गेल्या पाच वर्षात ते पहिल्यांदा पत्रकार परिषद घेणार अशी चर्चा सुरू झाल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. मात्र भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी पंतप्रधानांचा २५ व २६ एप्रिलचा वाराणसीमधला कार्यक्रम जाहीर करताना पत्रकार परिषदेचा उल्लेख चुकून केला असावा असे सांगण्यात येत आहे. तसेच, सदर अफवा स्थानिक भाजपा नेत्यांमुळे पसरली असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. ही अफवा काही वेळातच वाऱ्याच्या वेगानं सोशल मीडियावर पसरताच भाजपाच्या नेत्याने या सर्व अफवा असल्याचे सांगितले आहे.

 

पत्रकार परिषदेवरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेकदा लक्ष केले आहे. आतापर्यंतच्या संपूर्ण कार्यकाळात मोदींनी अनेकदा प्रसारमाध्यमांना मुलाखती दिल्या. मात्र आतापर्यंत त्यांनी एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीकाही करण्यात आली आहे. पंतप्रधान पत्रकारांशी संवाद साधत नाहीत असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेकवेळा केला आहे. मुंबईतील एका प्रचारसभेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले होते की, मी पत्रकार परिषद घेतो. चौकीदाराला तुम्ही कधी पत्रकार परिषद घेताना पाहिले आहे का? तर नुकत्याच पत्रकारांशी साधलेल्या संवादातही राज ठाकरे यांनी मोदींना तुम्ही प्रश्न तरी विचारू शकता का असा सवाल विचारत, ते तुम्हाला भेटतच नाहीत तर तुम्ही प्रश्न काय विचारणार असे म्हटले होते. ठराविक प्रसारमाध्यमांना मुलाखती देऊन फिक्स केलेली प्रश्नोत्तरे होतात असा आरोपही या नेत्यांनी केला होता. त्यामुळे नरेंद्र मोदी खरंच पत्रकार परिषद घेतात की काय, अशी चर्चा सदर अफवेमुळे सोशल मीडियावर सुरू झाली होती, जिला पूर्णविराम मिळाला आहे.