मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

सांगली : काँग्रेसची सांगलीत शाखा नाही हे कुलूप लावून काँग्रेस कार्यकर्त्यांनी सिध्द केले असल्याने आम्हीच खरे स्वाभिमानी आहोत, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संख येथे बुधवारी झालेल्या जाहीर सभेत केला. ऊस बिल आंदोलनात ज्यांना शिव्यांची लाखोली वाहिली त्यांच्या मांडीला मांडी लावून स्वाभिमानी बसली असून महाआघाडीची महाखिचडी झाल्याचा आरोप त्यांनी केला.

संख (ता. जत) येथे खासदार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. फडणवीस  म्हणाले,की राज्य शासन पक्षपाती भूमिका घेऊन सिंचन योजनांमध्ये दुजाभाव करत असल्याचा आरोप विरोधकांकडून सतत केला जात आहे. परंतु विदर्भ आणि मराठवाडय़ाप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन योजनांना मोठा निधी देऊन त्या योजना पूर्णत्वास आणल्या आहेत. याशिवाय बंद पडलेल्या योजनाही सुरू केल्या आहेत. बळिराजा सिंचन योजना व पंतप्रधान सिंचन योजना सुरू करून राज्य शासनाने बंद जलवाहिन्यांमधून शेतकऱ्यांना पाणी देण्याचा प्रयत्न केला आहे.

जत तालुक्याच्या पूर्व भागातील विस्तारित पाणी योजनेला तत्त्वत मान्यता देण्यात आली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात पाणी आले आहे.

आता पूर्व भागातही पाणी आल्यामुळे तेथेही परिवर्तन होईल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले,की आदिवासी समाजासाठी अस्तित्वात असलेल्या सर्व योजनांचा लाभ धनगर समाजाला लागू असेल, जातीपातीचे राजकारण करून समाजात विष कालविण्याचा  प्रयत्न काही जण करत आहेत, परंतु त्याकडे लक्ष न देता मतदारांनी राज्य शासन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी खासदार संजय पाटील यांना मताधिक्य देऊन विजयी करावे असे आवाहन या वेळी  फडणवीस  यांनी केले.

या वेळी खा. पाटील, आ. विलासराव जगतपा यांचीही भाषणे झाली. या जाहीर सभेसाठी  आमदार सुरेश खाडे, दिनकर पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, बालगाव मठाचे प्रमुख अमृतानंद स्वामीजी, बाजार समिती माजी सभापती प्रकाश जमदाडे, भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. रवींद्र आरळी, पक्षाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी, जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती तम्मणगौडा रवी-पाटील, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, शिवाजीराव ताड, राजेंद्र कन्नुरे, विवेक कांबळे, उमेश सावंत, प्रभाकर जाधव, मंगल पाटील, आर. के. पाटील, संजय कांबळे, कविता खोत, संजय तेली, आर. बी. पाटील उपस्थित होते.