मुख्यमंत्री फडणवीस यांच्या टिकेचा समाचार घेताना उदयनराजे भोसले म्हणाले, ही विकास कामे युती सरकार सत्तेत असताना झाली हे खरे असले तरी तुम्हीं लोकांवर उपकार नाही केलेत. लोकप्रतिनिधी भांडून, पाठपुरावा करून योजना मंजूर करून घेतात. निधी मिळवतात. अशा लोकप्रतिनिधींपैकी मी आहे. आणि म्हणूनच तुम्हाला कामं करावी लागली असा टोला त्यांनी मारला.

आमच्या महा आघाडीला विरोधक खिचडीची उपमा देतात. मात्र जनतेला दोन वेळच पोटभर अन्न देणारी ही खिचडी आहे.बहुमत मिळताच जनतेकडे पाठ फिरवाणा-यांकडून जनतेने काय अपेक्षा बाळगाव्यात.यांच्या राजवटीत त्यांनी लोकशाहीतील राजांना भिकारी केले आणि हातात रिकामे वाडगे दिले. दिल्लीच्या तक्तावर पोहोचल्यावर यांना जनतेचा विसर पडतो आणि एका जवानापेक्षा व्यापारी साहसी असतो असे सांगतात. या त्यांच्या वक्तव्यातून मन की बात कमी आणि धनकी बात जास्त असल्याचे दिसून येते, असे उदयनराजे म्हणाले. वंचित शब्दाबद्दल मला राग आहे. देशात कोणीही अन्न, वस्त्र, निवारा, अारोग्य सुविधा आदींपासून वंचित राहता कामा नये.

यावेळी शशिकांत शिंदे म्हणाले उदयनराजे हे संयमी आणि मुत्सधी उमेदवार आहेत. त्यांनी विरोधकांनी केलेल्या घाणेरड्या ,वैयक्तिक आरोपांकडे दुर्लक्ष केले .ते सर्वमान्य उमेदवार आहेत.त्यांनी साताऱ्यात संपर्क आणि कामे केली नसती व त्यांची चांगली प्रतिमा आहे म्हणूनच तुम्हीही त्यांना पक्षात घेत होता . एकत्र घरात थोडे मतभेद असतात पण आम्ही कधीही जाहीर वाच्यता केली नाही . एकत्र बसलो समज गैरसमज दूर झाले .आजच्या एव्हढ्या मोठ्या सभेने त्यांचा विजय नक्की झाला आहे.यावेळी श्रीनिवास पाटील, राजेंद्र गवई, वसंतराव मानकुमरे आदींची भाषणे झाली.

जिल्हा परिषदेच्या मैदान सभेच्या गर्दीने मैदान तुडुंब भरुन वहात होते. रस्त्यावरही लोक उभे राहून सभा ऐकत होते. यावेळी धैर्यशील कदम, रमेश पाटील, ऍड. विजयराव कणसे, भीमराव पाटील, आनंदराव कणसे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते,नितीन पाटील, प्रकाश बडेकर, माजी सभापती शशिकांत पिसाळ, देवराज पाटील, सतिश चव्हाण, बाबासाहेब कदम, सातारा-वाई-कोरेगाव- कराड-जावळी पाटण या तालुक्यांतून मोठ्या संख्येने नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते.

या सभेस शिवाजीराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील,आनंदराव पाटील, विक्रमसिंह पाटणकर,प्रभाकर घार्गे, सातारच्या नगराध्यक्षा माधवी कदम, सुनील माने,सत्यजितसिंह पाटणकर, दलित पँथरचे सुखदेव सोनवणे आदी प्रमुख उपस्थित होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रास्ताविक केले. सर्वांनी सातारचा स्वाभिमान उदयनराजे यांना मोठ्या मतांनी निवडून द्यावे असे सांगितले.