लोकसभा निवडणूक हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव होता. निवडणुकीतील वाद आता मागे सोडून पुन्हा नवीन भारत घडवण्यासाठी काम करु असे केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी म्हणाले. नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे नितीन गडकरी ८६ हजार मतांनी आघाडीवर आहेत. जनतेचा कौल स्वीकारणे ही राजकीय पक्षांची जबाबदारी आहे असे गडकरी म्हणाले.

५० वर्षात जे झालं नाही ते काम आमच्या सरकारने करुन दाखवलं. देशाचा पंतप्रधान हा पक्षाचा नव्हे देशाचा असतो. ‘पंतप्रधान चोर है’ ही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भाषा योग्य नव्हती असे मत गडकरी यांनी व्यक्त केले. आता कटुता संपवून लोकशाही यशस्वी बनवण्यासाठी प्रयत्न करुया असे आवाहन गडकरींनी केले.

२०१४ मध्ये लोकांच्या मनात सरकारबद्दल अविश्वास, राग होता. त्यावेळी एक आशा म्हणून जनतेने भाजपाला निवडले होते. आम्ही स्थिर, विकासाभिमुख सरकार दिले असे गडकरी म्हणाले.