देशात २३ मे रोजी सर्वांनाच लोकसभा निवडणुकीच्या निकालाची प्रतिक्षा लागली होती. अनेकांचे डोळे टीव्हीवरच्या निकालांकडे लागले होते. वृत्तवाहिन्यांचे अँकर निवडणूक विश्लेषकांच्या मदतीने जनमताचा कौल कुठल्या दिशेला आहे ते सांगत होते. निकालाच्या आकडयांमधला चढ-उतार पाहून अनेक भाजपा समर्थकांचे टेंशन वाढत होते. पण या निकालाच्या या धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र ई-मेल पाहण्यामध्ये व्यस्त होते. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले.

निकालाच्या दिवशी त्यांनी नेहमीपेक्षा जास्त वेळ ई-मेलच्या कामामध्ये घालवला. त्यांनी बहुतेक ई-मेल फॉरवर्ड केले तर काही ई-मेलला त्यांनी स्वत: उत्तर दिले. सकाळी १०.३० वाजता पंतप्रधान मोदींनी ई-मेलचे काम संपवले व निकालाच्या आकडयांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. निकालाचा कल भाजपाला अनुकूल असाच होता. तासाभराने भाजपाची आघाडी अधिक मजबूत झाली व भाजपा सरकार पुन्हा येणार असल्याचे स्पष्ट झाले.

टीव्हीवर निकाल पाहण्याबरोबरच पंतप्रधान मोदी अन्य सूत्रांकडूनही निकालाची माहिती घेत होते. मतमोजणी केंद्रावरुन येणाऱ्या माहितीची पंतप्रधान मोदी वेळोवेळी चौकशी करत होते. मतदार भाजपा सरकारवर विश्वास दाखवतील याची मोदी यांना खात्री होते. निकालाच्या दुसऱ्यादिवशी शुक्रवारी मोदींनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. शुक्रवार या सरकारचा शेवटचा दिवस होता. मोदींनी पंतप्रधान कार्यालयातील स्टाफची सुद्धा भेट घेतली.