|| सौरभ कुलश्रेष्ठ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘लोकसत्ता’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत प्रतिपादन

नवमतदार आणि सरकारी योजनांचे लाभार्थी ठरलेले गरीब मतदार हे या लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी निर्णायक कौल देतील, असे निरीक्षण नोंदवत राज्यात भाजप-शिवसेना युतीलाच सर्वाधिक जागा मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापासून ते साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वादग्रस्त विधानांपर्यंत विविध मुद्दय़ांवर सविस्तर भाष्य केले.

२०१४च्या निवडणुकीसारखे राजकीय वातावरण-मोदी लाट यंदा दिसत नाही याबाबत विचारले असता, गेल्या वेळी मध्यमवर्ग नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान व्हावे यासाठी खूप आक्रमकपणे पुढे येत होता. आता पाच वर्षांच्या कारभारात मोदी सरकारने सर्वसामान्य कुटुंबांना-गरिबांना मदत होईल अशा अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या. आता त्या वर्गात मोदी यांच्याबद्दल सुप्त लाट आहे. हा वर्ग समाजमाध्यमांवर नसतो की प्रसारमाध्यमांशी आक्रमकपणे संवाद साधत नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये मोदी सरकारच्या बाजूने असलेली सुप्त लाट दिसत नसली तरी आम्हाला ती लक्षात येत आहे. शिवाय नवमतदार हा पंतप्रधान मोदी यांच्या बाजूने आहे. कारण तो जाणता झाला तसे त्याने मोदी यांचे निर्णयक्षम सरकारच पाहिले आहे. हा नवमतदार जातीपातीपलिकडे विचार करतो आणि तो मोदी यांच्या बाजूने असल्याने त्यांचे मतदानही भाजपचे सरकार पुन्हा येण्यासाठी निर्णायक ठरेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

विरोधकांकडे भाजप सरकारच्या विरोधात बोलण्यासारखे फारसे काही नाही. सरकारबद्दल असंतोषही (अ‍ॅंटी इन्कबन्सी) दिसत नाही. त्यामुळे विरोधक आता जातीपातीच्या राजकारणावर उतरले आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पराभव समोर दिसत असल्याने अस्वस्थ झाले असून त्यातूनच त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून पातळीसोडून विधाने होत आहेत, असा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.

भाजपच्या प्रचारात पाच वर्षांच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यात येत आहे. पण कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या जाहीरनाम्यात सैन्यादलाचे विशेषाधिकार काढण्याचे, देशद्रोहाचे कलम रद्द करण्याचे, काश्मीरमधील सैन्यदलाचे प्रमाण कमी करण्याचे आश्वासन दिल्याने आपोआपच राष्ट्रवादाचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. शिवाय त्याबाबतच्या विधानांना लोकांचा आणि माध्यमांचाही प्रतिसाद जास्त असतो, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे साटेलोटे असून विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे आघाडीसोबत गेलेले दिसतील, असे भाकितही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. त्याचबरोबर साध्वी प्रज्ञासिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल तसे विधान करणे चुकीचे आहे, अशी स्पष्टोक्तीही फडणवीस यांनी केली. मात्र, त्याचवेळी कॉंग्रेसचे राहुल गांधी हेही जामिनावर सुटलेले असल्याकडे लक्ष वेधत साध्वी यांना उमेदवारी देण्याच्या पक्षाच्या निर्णयाचे फडणवीस यांनी समर्थन केले.

..म्हणून राष्ट्रवादाचा मुद्दा महत्त्वाचा

भाजपच्या प्रचारात पाच वर्षांच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यात येत आहे. पण कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या जाहीरनाम्यात सैन्यादलाचे विशेषाधिकार काढण्याचे, देशद्रोहाचे कलम रद्द करण्याचे, काश्मीरमधील सैन्यदलाचे प्रमाण कमी करण्याचे आश्वासन दिल्याने आपोआपच राष्ट्रवादाचा मुद्दा महत्त्वाचा ठरला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नवमतदार जाणता झाला, तेव्हा त्याने मोदी यांचे निर्णयक्षम सरकारच पाहिले आहे. हा मतदार जातीपलीकडे विचार करतो आणि तो मोदी यांच्या बाजूने असल्याने त्यांचे मतदान भाजपचे सरकार पुन्हा येण्यासाठी निर्णायक ठरेल.      – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री