ऐन दुष्काळात महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची टिका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकारपरिषदेमध्ये बोलताना केली. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून सरकार निवडणूक प्रचारात दंग असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने वाचकांना धनंजय मुंडेने केलेली टिका योग्य वाटते का असा प्रश्न विचारला. सव्वा दोन हजारहून अधिक वाचकांनी या प्रश्नाचे उत्तर दिले. फेसबुकवरील ६३ टक्के वाचकांनी होय सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे असे मत नोंदवले आहे. तर ट्विटवर होय उत्तर देणाऱ्या वाचकांची संख्या ६७ टक्के इतकी आहे.

राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे. पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा आ वासून उभा आहे. मात्र दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना या सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने राज्यभर फिरताना आत्तापर्यंत दहा जिल्ह्यांमध्ये अतिशय भीषण दुष्काळ जाणवल्याचेही मुंडे यांनी भाजपावर टिका करताना म्हटले होते. यावरुनच ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने वाचकांना ‘ऐन दुष्काळात महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले ही धनंजय मुंडेंची टीका पटते का?’ हा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला फेसबुकवर दोन हजार वाचकांनी उत्तर दिले. त्यापैकी १२०० (६३ टक्के) हून अधिक जणांनी ‘होय’ असे उत्तर दिले. म्हणजेच ६३ टक्के वाचकांनी सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे मत पटत असल्याचे सांगितले. तर ३७ टक्के वाचाकांनी ‘नाही’ असे उत्तर देत सरकार शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडल्याचे आपल्याला वाटत नसल्याचे सांगितले. नाही उत्तर देणाऱ्या वाचकांची संख्या ७५४ इतकी आहे.

ट्विटवर याच प्रश्नाला ४७१ जणांनी उत्तर दिले आहे. त्यापैकी ६७ टक्के वाचकांनी धनंजय मुंडेंच्या मताशी सहमत असल्याचे सांगत सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे म्हटले आहे. तर ३३ टक्के वाचाकांनी सरकारने शेतकऱ्यांकडे दूर्लक्ष केले नाही असं मत व्यक्त केलं आहे.

दरम्यान मागील काळात सरकारने जाहीर केलेली अनुदाने मिळालेली नाहीत, कर्जमाफीची अंमलबजावणी योग्य पध्दतीने झालेली नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. अनेक मुलभूत प्रश्नांच्या पेक्षाही राज्यातील दुष्काळामुळे त्रस्त शेतकर्‍यांमध्ये सरकार विरूध्दचा तीव्र असंतोष पहावयास मिळत असून, हा असंतोष मतपेटीतून व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही असंही मुंडे पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले होते.

नक्की वाचा >> दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले-धनंजय मुंडे

मंगळवारी सरकारवर टिका करताना मुंडे यांनी टँकर्सनेही अनेक गावांना पाणीपुरवठा केला जात नसल्याचे म्हटले. यावर्षी राज्यात इतका भीषण दुष्काळ आहे की, मागच्या वर्षी याच काळात एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला राज्यात केवळ ६११ टँकर्स सुरू होते, यावर्षी एप्रिल महिन्यातच ३ हजार ९७० टँकर्सने गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. यावरून पाण्याच्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात येते. अनेक गावांमध्ये मागणी होऊनही टँकर्स सुरू झाले नाहीत असाही आरोपही मुंडेंनी यावेळी बोलताना केला.

मुंडे यांनी चारा प्रश्नावरुनही सरकारवर टिका केली. ‘औरंगाबाद, नाशिक आणि पुणे विभागातील जनावरांची संख्या ८५ लाख असताना छावण्यांमधून केवळ ६ लाख जनावरांना आसरा मिळालेला आहे, लाखो जनावरांच्या चार्‍याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. सरकारने चारा छावणीला द्यायचा की, थेट मदत द्यायची की, छावण्या उघडायच्या? याबाबत निर्णय घेण्यातच तीन महिने घालवले. शेतकर्‍यांची केवळ पाच जनावरे छावण्यांमध्ये घ्या, स्वयंसेवी संस्थांना प्राधान्य द्या, आढावा घ्या, छावण्यांचे अधिकार पालकमंत्र्यांना द्या, अशा जाचक अटी घातल्यामुळे अनेक तालुक्यांमध्ये छावण्या सुरू झाल्याच नाहीत’ असं मुंडे यांनी सांगितलं.