शिवराज यादव, सांगली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपण लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर करत भाजपाचा पराभव करण्यासाठी दंड थोपटले आहेत. २०१४ मध्ये भाजपाला समर्थन घोषित करणाऱ्या राज ठाकरे यांनी यावेळी मात्र भाजपाविरोधात मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान सांगलीमध्ये मनसेने स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार विशाल पाटील यांना समर्थन जाहीर केलं आहे. सांगलीमधील काही मनसे कार्यकर्त्यांशी यासंबंधी संवाद साधत नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी राज ठाकरे देतील तो आदेश आमच्यासाठी अंतिम असेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

‘राज ठाकरे यांनी जे काही रान उठवलं आहे त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी जनतेची फसवणूक केली आहे. आम्ही २०१४ मध्ये त्यांना पाठिंबा दिला होता, पण आता राज ठाकरेंच्या आदेशानुसार स्वाभिमानीच्या विशाल पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे’, अशी माहिती मनसेचे पलूस तालुका अध्यक्ष सागर सुतार यांनी दिली आहे.

सध्या राज ठाकरेंची भाषणं ज्या पद्धतीने प्रसिद्ध होत आहेत ते पाहता लोकसभा निवडणूक लढवली असती तर फायदा झाला असता असं वाटत नाही का ? विचारलं असता, नक्कीच फायदा झाला असता, पण राज ठाकरेंनी जो काही निर्णय घेतला असेल तो विचार करुनच घेतला असेल. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून त्यांनी हा निर्णय घेतला असावा असं आम्हाला वाटत आहे आणि आम्ही तो १०० टक्के पाळणार आहे असं सांगताना भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवाराचा पराभव करण्यात आम्ही खारीचा वाटा उचलणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

‘२०१४ मध्ये राज ठाकरेंनी मोदींची जी स्तुती केली होती, ते त्यांचं गुजरातमधील काम पाहून केली होती. पण आता तो माणूसच बदलला असल्याने आमची भुमिकाच बदलली आहे असं मनसेच्या अतुल तातुगडे यांनी सांगितलं. राज ठाकरे यांनी एखाद्या ठराविक पक्षाला समर्थन करा असं अजिबात सांगितलेलं नाही, पण भाजप- सेनेला पुन्हा सत्ता मिळू न देणे हा एकमेव त्यांचा प्रयत्न असून विधानसभा निवडणुकीत मनसे सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल असा आत्मविश्वास मनसे कार्यकर्त्यांना वाटत आहे.

एक मनसे कार्यकर्ता म्हणून आधी ज्या पक्षाला विरोध केला आता त्याला पाठिंबा द्यायला लागत आहे यामुळे आपला गोंधळ उडतो का असं विचारलं असता, आधी जे काही झालं आहे ते सगळं मागे टाकून राज ठाकरेंचा आदेश आम्ही पाळणार असं त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी नोटाबंदी, जीएसटी सारख्या निर्णयांवर टीका केली. नोटाबंदीमुळे जिल्ह्यात प्रचंड नुकसान झालं, व्यापाऱ्यांना खूप मोठा फटका बसला. मोदींनी नवा भारत निर्माण करणार सांगितलं होतं, पण तसं काही दिसलं नाही. उलट अधोगती झाल्याचं दिसतंय. सर्वसामान्य लोकांनी साठवून ठेवलेला पैसा मोदींनी बाहेर काढला, मात्र खरे लोक पळून गेले अशी टीका यावेळी त्यांनी केली.
गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात काहीच विकास झाला नाही. भाजपाकडून काहीच फायदा झाला नाही उलट नुकसान झालं. फक्त सर्वसामान्य नाही तर शेतकऱ्यांनाही काही फायदा झाला नसल्याची टीका त्यांनी केली.