लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात पुन्हा एकदा मोदींचीच सत्ता येईल असं मत शिर्डीतल्या नागरिकांनी व्यक्त केलं आहे. शिर्डीत मॅट्रिक्स सलून चालवणारे सचिन आऊटी म्हणतात की खरंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा काहीसा किचकट आहे. मात्र  महायुतीचे सदाशिव लोखंडे निवडून येतील अशी चिन्हं आहेत. याचं मुख्य कारण आहे ते निळवंडे धरणासाठीचं करत असलेले प्रयत्न. त्यांच्या या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातली जनता त्यांना पाठिंबा देते आहे. तसेच ते शिर्डीत खासदार म्हणून दिसत नसले तरीही त्यांनी केलेली कामं लोकांना दिसत आहेत त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचा विजय होऊ शकतो.

देशपातळीवर विचार करता, पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच बसतील असा अंदाज सचिन आऊटी यांनी वर्तवला आहे. भाजपाबाबत देशात काहीसं नाराजीचं वातावरण आहे मात्र सुरक्षाविषयक धोरणांचा विचार केला आणि मोदींनी दिलेलं चोख प्रत्युत्तर पाहिलं तर हे मोदींचाच बोलबाला आहे आणि तेच पुन्हा एकदा सत्तेवर येतील असा अंदाज वाटतो.

हॉटेल व्यावसायिक महेश लोढा म्हणतात, शिर्डीत लोकसभा मतदार संघातले मतदार काहीसे नाराज आहेत. कारण सदाशिव लोखंडे यांच्याबाबत काहीशी नाराजी लोकांमध्ये आहेत त्यामुळे कदाचित इथे त्यांना पराभवही स्वीकारावा लागू शकतो. असं असलं तरीही देशाला मोदींची गरज आहे. त्यांच्यासारखा कणखर पंतप्रधान देशाला लाभला आहे आणि पुन्हा एकदा तेच पंतप्रधान व्हावेत अशी आमची इच्छा आहे असंही लोढा यांनी म्हटलं आहे. मी स्वतः काँग्रेसचा आहे तरीही मला वाटतं की मोदीच पंतप्रधान व्हावेत त्यामुळे देश प्रगतीपथावर जाईल असंही महेश लोढा यांनी म्हटलं आहे.

शिर्डीत साई स्वरा मेडिकल  चालवणारे सोमनाथ कावळे म्हणतात, देशाला मोदींची गरज आहे. कारण देशपातळीवर अनेक चांगले निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले आहेत. त्या निर्णयांमुळे त्यांची सत्ता येईल कारण त्या निर्णयांमुळे नवमतदारही त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत असं कावळे यांनी म्हटलं आहे. तसेच शिर्डीत सदाशिव लोखंडे जिंकू शकतात असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.