काँग्रेस अध्यक्षांची मुंबईकडे पाठ

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीनंतरही शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची राज्यात एकही संयुक्त सभा झाली नाही. दुसरीकडे, राहुल गांधी यांनी मुंबईत प्रचाराची नेत्यांची विनंती मान्य केली नाही.

काँग्रेसचे नेतृत्व राहुल गांधी यांच्याकडे आल्यावर पहिलीच निवडणूक असल्याने दोन्ही नेत्यांची संयुक्त सभा व्हावी, असे प्रयत्न झाले; पण पवार आणि राहुल यांची संयुक्त सभा झाली नाही. पवार यांना राहुल यांच्याबरोबर व्यासपीठावर जाणे योग्य वाटले नाही. यामुळेच संयुक्त सभा होऊ शकली नाही, असे समजते.

या वेळी मुंबईत राहुल गांधी यांची सभा किंवा रोड शो घेण्याची योजना होती; पण राहुल गांधी यांनी मुंबईत वेळ दिला नाही. राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांचा रोड शो झाला असता तर वातावरणनिर्मिती करण्यात यश आले असते; पण राहुल गांधी यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यांची जाहीर सभा शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्य़ातील संगमनेरमध्ये होत आहे; पण त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात मुंबईला स्थान मिळालेले नाही. मुंबईत सभा घेण्यास राहुल यांनी तयारी दर्शविली होती, पण सभा आयोजित करण्यास बरीच शक्ती खर्च होईल, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे होते. मुंबईत राहुल गांधी यांची सभा व्हावी किंवा त्यांचा रोड शो व्हावा, अशी मागणी केली होती; पण वेळेचे नियोजन जमू शकले नाही. यामुळे रोड शो होऊ शकला नाही, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी सांगितले. मुंबईत अखेरच्या टप्प्यात पी. चिदम्बरम, मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभा होणार आहेत.

पवार आज ठाण्यात, राहुल संगमनेरमध्ये

शरद पवार यांच्या आज, शुक्रवारी कल्याण आणि ठाण्यात प्रचारसभा होणार आहेत.  तर राहुल गांधी यांची शिर्डी मतदारसंघातील संगमनेरमध्ये सभा होणार आहे. सिन्नरमध्ये राहुल यांची सभा झाली असती तर पवार उपस्थित राहण्याची शक्यता होती. पण काँग्रेसने शिर्डी मतदारसंघात सभा घेतल्याने पवारांनी तेथे जाण्याचे टाळले.

मोदी-ठाकरे यांची आज मुंबईत सभा

मुंबईतील सहा जागांसह ठाणे, पालघरमधील अशा एकूण १० लोकसभा मतदारसंघांतील प्रचार शनिवारी संपत असून युतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा आज, शुक्रवारी २६ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील उर्वरित १७ मतदारसंघांत सोमवारी, २९ एप्रिलला मतदान होत आहे. प्रचाराची मुदत शनिवार २७ एप्रिलला संपत आहे. मुंबईतील सहा, ठाणे जिल्ह्य़ातील तीन व पालघरची एक अशा दहा लोकसभा मतदारसंघांत भाजप चार तर शिवसेना सहा जागा लढवत आहे. या दहा लोकसभा मतदारसंघांतील युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेना-भाजपचे मोठे नेते या सभेत सहभागी होतील.