चंद्राबाबू ममतांच्या भेटीला; निकालापूर्वी २१ तारखेला दिल्लीत विरोधकांची बैठक

विशेष प्रतिनिधी

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी प्रादेशिक पक्षांचा महासंघ तयार करण्याच्या दृष्टीने विविध नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली असतानाच, राव यांचे प्रतिस्पर्धी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू हेसुद्धा सक्रिय झाले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेण्याकरिता तसेच प्रचारात सहभागी होण्यासाठी ते कोलकत्त्यात दाखल झाले आहेत. केंद्रातील आगामी सरकार स्थापण्यात प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्त्वाची असेल, असा दावा केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी केल्याने पुन्हा एकदा १९९६ प्रमाणे राजकीय परिस्थिती उद्भवल्यास प्रादेशिक पक्षांना महत्त्व प्राप्त होऊ शकते.

सर्व विरोधी नेत्यांची २१ मे रोजी नवी दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. काँग्रेस किंवा भाजपला पुरेसे संख्याबळ न मिळाल्यास १९९६ प्रमाणे प्रादेशिक पक्षांना महत्त्व येऊ शकेल, असे प्रादेशिक नेत्यांचे गणित आहे. तेव्हा काँग्रेसच्या पाठिंब्यावर देवेगौडा आणि गुजराल हे पंतप्रधान झाले होते. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी विविध राज्यांमध्ये जाऊन नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या असतानाच चंद्राबाबू नायडूही भेटीगाठींसाठी हैदराबादच्या बाहेर पडले आहेत.

राहुल गांधी यांच्याशी चर्चा

चंद्राबाबूंनी बुधवारी सकाळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. मतपावत्यांच्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर चंद्राबाबू हे कोलकत्त्यास रवाना झाले. पश्चिम बंगालमध्ये चंद्राबाबू हे तृणमूल काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ दोन सभांमध्ये सहभागी होणार आहेत. उद्या त्यांची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबरोबर बैठक होणार आहे.

देशातील मतदारांचा कौल हा भाजप आणि काँग्रेस विरोधी असल्याचे जाणवते. यामुळेच तिसऱ्या आघाडीला यश मिळेल, असे केरळचे मुख्यमंत्री विजयन यांचे म्हणणे आहे. सरकार स्थापण्यात प्रादेशिक पक्ष महत्त्वाची भूूमिका बजावतील, असे विजयन यांनी स्पष्ट केले. पण त्याच वेळी पंतप्रधानपदाबाबत त्यांनी मौन बाळगले.

दक्षिणेकडील राज्यांमध्ये लोकसभेच्या १३० जागा असून, तेलंगणा राष्ट्र समिती, तेलुगू देशम, वाय एस आर काँग्रेस, अण्णा द्रमुक, द्रमुक या प्रादेशिक पक्षांचे संख्याबळ चांगले असेल, अशी शक्यता वर्तविली जाते.

चंद्रशेखर राव हे पुढील सोमवारी द्रमुक नेते स्टॅलिन यांची भेट घेण्यासाठी चेन्नईचा दौरा करणार असले तरी स्टॅलिन यांनी वेळ दिलेला नाही, असे द्रमुकच्या गोटातून सांगण्यात आले. चंद्रशेखर राव यांना महत्त्व देण्यास द्रमुकचा विरोध आहे.

दिल्लीचे वेध..

प्रादेशिक नेत्यांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. चंद्राबाबू नायडू यांनाही राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजाविण्याची इच्छा आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तर पंतप्रधानपदावर डोळा आहे. प्रादेशिक पक्षांनी जोर लावला असून, सरकार स्थापण्यात महत्त्व आल्यास पुरेपूर किंमत वसूल करण्याची शक्यता आहे.