देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार हे स्पष्ट होताच जगातल्या विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधानांकडून मोदींना शुभेच्छा संदेश येण्यास सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी  दोन्ही देश लोकांच्या भल्यासाठी मिळून काम करतील अशी अपेक्षा इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे.

रविवारी इम्रान खान यांनी मोदींना फोन केला. लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. पाकिस्तान विदेश मंत्रलयाकडून याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यामध्ये मोदींसोबत काम करण्याची इच्छा इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे. दोन्ही देशांत शांतता आणि समृद्धीसाठी हिंसामुक्त, दहशतवादमुक्त वातावरणाची खूप आवश्यकता आहे’ असे प्रत्युत्तर नरेंद्र मोदी यांनी इम्रान खान यांना दिले. पुलवामा हल्ला आणि एअरस्ट्राइकनंतर दोन्ही देशाच्या पंतप्रधानांमध्ये पहिल्यांदाच फोनवर चर्चा झाली.

पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद फैसल यांनी रविवारी ट्विट करून ही माहिती दिली. त्यामध्ये ते म्हणतात. दक्षिण आशियात शांतता, विकास आणि समृद्धीसाठी इम्रान खान पंतप्रधान मोदींसोबत काम करण्यास इच्छुक आहेत.

शपथविधी सोहळ्याचे इम्रान खान यांना निमंत्रण ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधी सोहळ्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना निमंत्रण देणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. २०१४ साली पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेताना नरेंद्र मोदी यांनी सर्वच सार्क देशाच्या प्रमुखांना निमंत्रित केले होते.त्यामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफही होते. पाकिस्तान सुद्धा सार्कचा सदस्य आहे. मोदींच्या निमंत्रणाला मान देऊन नवाझ शरीफ त्यावेळी शपथविधीसाठी भारतात आले होते. शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी मोदींबरोबर चर्चाही केली होती. भारत-पाकिस्तानमध्ये शांतता नांदावी हा त्या चर्चेमागे उद्देश होता. पण पाकिस्तानच्या दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या भूमिकेमुळे पाच वर्षात संबंध पार बिघडले. पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली होती. मोदी यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात भारताने पाकिस्तानमध्ये दोन मोठे स्ट्राइक केले. पाकिस्तानच्या दहशतवादाला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले.  इम्रान खान यांना निमंत्रण मिळणार का? हे लवकरत स्पष्ट होईल.

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी २३ मे रोजीही ट्विट करत मोदींना शुभेच्छा दिल्या होत्या. दक्षिण आशियात शांतता, समृद्धता आणि विकासासाठी आपल्याला मोदींसोबत काम करायचे आहे असे इम्रान यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले होते. पंतप्रधान मोदींनी सुद्धा त्या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद दिला. मोदींनी इम्रान यांचे आभार मानताना मी सुद्धा दक्षिण आशियात शांतता आणि विकासाला प्राधान्य दिले आहे असे म्हटले.