जसं क्रिकेटच्या वर्ल्डकपमध्ये भारत- पाकिस्तान सामन्याशिवाय पैसे कमावता येत नाही, टीआरपी मिळत नाही, तसंच निवडणुकीत असतं. आता प्रसारमाध्यमांना वाराणसीतील निवडणुकीत रस राहिलेला नाही, मोदींचा विजय निश्चित आहे असे त्यांना वाटत आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. गुरुवारी काँग्रेसने वाराणसीतून अजय राय यांना उमेदवारी दिल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी हे विधान केले आहे.

वाराणसीत शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यात त्यांनी कार्यकर्त्यांना विरोधकांवर टीका करताना भान राखण्याचा सल्लाही दिला.  जर तुम्ही मोदींचे प्रामाणिक सैनिक असाल तर टीव्हीवरील चर्चांमध्ये वाद घालणाऱ्यांकडून प्रेरणा घेऊ नका. मैत्री आणि प्रेम राजकारणात आवश्यक आहे. या दोन गोष्टी राजकारणातून संपुष्टात येत आहेत. आपल्याला राजकारणात ही गोष्ट पुन्हा आणायची आहे, एखाद्याने मला कितीही खालच्या पातळीच्या शिव्या दिल्या तरी तुम्ही चिंता करु नका. जेव्हा कोणी वादग्रस्त टीका केली तर ती माझ्या खात्यात जमा करा. मी कचऱ्यातही कमळ फुलवतो, असे मोदींनी सांगितले. वाराणसीतील निवडणूक अशी झाली पाहिजे की ज्यावर राजकीय विश्लेषकांना एक पुस्तकच लिहावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.

माझी एक इच्छा आहे, जी गुजरातवाले कधी पूर्ण करु शकले नाहीत. बनारसवाले माझी इच्छा पूर्ण करतील का?, असा प्रश्न विचारत मोदी म्हणाले, मला वाटते की वाराणसीतील पुरुषांपेक्षा महिलांचे मतदान पाच टक्क्यांनी जास्त झाले पाहिजे. माझ्यासाठी निवडणुकीतील विजय किंवा पराभव महत्त्वाचा नाही. पण पोलिंग बूथवरील माझ्या कार्यकर्त्याचा पराभव व्हायला नको, असेही त्यांनी नमूद केले.