२००८ मध्ये मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी स्वाधी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपाने भोपाळमधून लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे. मात्र, या उमेदवारीवर मालेगाव स्फोटातील एका पीडिताच्या वडिलांनी आक्षेप घेतला असून साध्वी यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशा मागणीची याचिका त्यांनी मुंबईतील राष्ट्रीय तपास पथकाच्या (एनआयए) कोर्टात केली आहे. या याचिकेला साध्वींनी उत्तर दिले असून हा प्रसिद्धीचा स्टंट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


मुंबईच्या विशेष एनआयए कोर्टात साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आपल्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ही एक शुल्लक तक्रार आहे. हा राजकीयदृष्ट्या प्रेरित आणि प्रसिद्धीसाठीचा स्टंट आहे. त्यामुळे हा अर्ज फेटाळण्यात यावा तसेच अर्जदाराला जरब बसेल अशा स्वरुपाचा दंड ठोठावण्यात यावा.

दरम्यान, यासंदर्भात मुंबई एनआयएने देखील विशेष एनआयए कोर्टाला आपले उत्तर पाठवले असून यात कोर्टाने म्हटले आहे की, हे प्रकरण निवडणूक आणि निवडणूक आयोगाशी संबंधीत आहे. त्यामुळे हे प्रकरण एनआयए कोर्टाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही.