News Flash

बारामतीमध्ये आमची ताकद थोडीशी कमी पडली – गिरीश बापट

'लोकसभा निवडणुकीत भाजपाला देशभरातील जनतेने चांगली साथ दिली'

बारामतीमध्ये आमची ताकद थोडीशी कमी पडली – गिरीश बापट

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला देशभरातील जनतेने चांगली साथ दिली असून त्याच प्रमाणात पुणे जिल्ह्यात देखील दिली आहे. मात्र यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात आमची ताकद थोडी कमी पडली असं मत पुणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडलं. यावळी जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवरही त्यांनी भाष्य केलं.

‘पुणे जिल्ह्यात मागील निवडणुकीप्रमाणे यावेळीदेखील प्रत्येक ठिकाणी नागरिकांचा उमेदवाराला पाठिंबा मिळाला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान प्रत्येक भाषणात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे प्रचंड मतांनी निवडून येतील असे सांगितले होते. तर ज्या उमेदवाराला किंवा व्यक्तीला राजकीय परिपक्वता नसताना, तो कोणाचा नातू किंवा मुलगा आहे. म्हणून त्याला राजकारणात स्थान द्यायचे हे योग्य ठरणार नाही. त्यासाठी त्याला स्वतःला पुढे येऊन सिद्ध करावे लागणार आहे’, असा टोला गिरीश बापट यांनी पार्थ पवार यांच्या पराभवाच्या निमित्ताने पवार कुटुंबाला लगावला. तर राजकारणात नगर मधून सुजय विखे यांनी स्वतःला सिद्ध केल्याचे सांगत त्यांचे कौतुक देखील केले.

आता पालकमंत्री कोण असणार त्यावर ते म्हणाले की, माझ्यापेक्षा चांगल काम करणारा पालकमंत्री तुम्हाला मिळणार आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाचा उत्तरधिकारी कोण असेल त्यावर ते म्हणाले की, आजवर राजकीय जीवनातील प्रत्येक निर्णय सर्वांना सोबत घेऊन घेतला आहे. त्यामुळे कसब्याचा उत्तराधिकारी निवडण्याचा निर्णय देखील सर्वानी मिळून घेऊ आणि लवकरच जाहीर करु.

मला 11 हजार 500 मते कमी मिळाली
पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चौथ्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी पार पडली. महायुतीकडून गिरीश बापट आणि आघाडीकडून मोहन जोशी हे निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत गिरीश बापट यांना 6 लाख 32 हजार 835 आणि मोहन जोशी यांना 3 लाख 8 हजार 207 मते मिळाली. या आकडेवारीवरून गिरीश बापट हे तब्बल 3 लाख 24 हजार 628 मतांनी विजयी झाले. मात्र यामध्ये गिरीश बापट यांनी मतदान झाल्याच्या दुसर्‍या दिवशी त्यांचे सहकारी आणि मित्र परिवाराशी आपल्याला किती मते मिळतील याबाबतची आकडेमोड केल्यावर त्यांना 6 लाख 44 हजार 500 मते मिळतील अशा स्वरूपाचा आकडा त्यांनी एका कागदावर त्यावेळी लिहून ठेवला होता. त्या आकडेवारीचा कागद दाखवत गिरीश बापट यांनी मला 11 हजार 500 मते कमी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अशा प्रकारची आकडेमोड मी प्रत्येक निवडणुकीत करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2019 3:43 pm

Web Title: pune mp girish bapat on baramati constituency sharad pawar family lok sabha election
Next Stories
1 जाणून घ्या, मोदींच्या विजयामागील आठ कारणे
2 भारतीय मुस्लीम राजकीय अनाथ – मोदीविजयावर ‘गार्डियन’चं संपादकीय
3 BLOG : मोदीच का जिंकले आणि विरोधक का पडले?
Just Now!
X