काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत काँग्रेसने गृहमंत्री राजनाथ सिंह यांना एक पत्र लिहून त्यात राहुल गांधींच्या सुरक्षेत ढिलाई होत असल्याचे म्हटले आहे. बुधवारी अमेठीत प्रचारादरम्यान, राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर अनेकदा हिरव्या रंगाच्या लेझर लाईट मारण्यात आला. ही लेझर लाईट स्नायपर गनची लाईट असावी अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा पुरावा म्हणून काँग्रेसने गृहमंत्रालयाकडे या घटनेचा व्हिडिओ देखील पाठवला आहे.

काँग्रेसने सादर केलेला हा व्हिडिओ १५ सेकंदांचा असून यामध्ये अनेकदा राहुल गांधींच्या चेहऱ्यावर लेझर लाईट मारल्याचे स्पष्ट दिसते आहे. मात्र, या व्हिडिओची सत्यता समोर आलेली नाही. राफेलप्रकरणी सुप्रीम कोर्टाने नुकत्याच दिलेल्या निर्णयावर राहुल गांधी माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना हा प्रकार घडला होता.

राहुल गांधींनी बुधवारी आपला लोकसभा मतदारसंघ अमेठीत शक्तीप्रदर्शन करीत दोन तास रोड शो केला त्यानंतर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत बहिण काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा, मेव्हणे रॉबर्ट वढेरा आणि त्यांची दोन मुले रेहान आणि मिराया देखील उपस्थित होते. युपीएच्या अध्यक्षा आणि राहुल गांधींच्या आई सोनिया गांधी रोड शोमध्ये सहभागी नव्हत्या. मात्र, त्यांनी राहुल यांचा अर्ज भरतेवेळी उपस्थिती लावली होती.

देशातील अतिमहत्वाच्या व्यक्तींना एसपीजी सुरक्षा पुरवली जाते. त्यामुळे संपूर्ण गांधी कुटुंबाला देखील ही सुरक्षा दिली जाते. एव्हढी कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. काँग्रेसने गांधी कुटुंबांच्या सुरक्षेत ढिलाई झाल्याचे गृहमंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

फोटोग्राफरच्या मोबाईलची लाईट असावी?
दरम्यान, राहुल गांधींच्या सुरक्षेबाबतचे कसलेही पत्र मिळाले नसल्याचे गृहमंत्रालयाला म्हटले आहे. तसेच एसपीजीच्या संचालकांनी या प्रकरणाच्या तपासणीचे आदेश दिले होते. या तपासानंतर एसपीजीकडून गृहमंत्रालयाला अहवाल देण्यात आला आहे.

यामध्ये राहुल गांधींच्या चेहऱ्यावर मारण्यात आलेली हिरवी लाईट ही काँग्रेसच्या फोटोग्राफरच्या मोबाईल फोनची असल्याचे म्हटले आहे.