राफेलबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतचे ‘चौकीदार चोर हैं’ हे विधान सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी घातल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे खेद व्यक्त केल्यानंतर आता त्यांना न्यायालयाने  अवमान नोटीस जारी केली आहे. या  प्रकरणी ३० एप्रिलला सुनावणी होणार आहे.

राहुल गांधी यांची बाजू वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी मांडली. त्यानंतर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितले, की राहुल गांधी यांना यात नोटीस पाठवणे उचित आहे. त्याशिवाय पुढील मंगळवारी या याचिकेबरोबरच राफेल निकाल फेरविचार याचिकेचीही सुनावणी करण्यात येईल.

राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील तपशिलाची माहिती देण्यास न्यायालयाने वरिष्ठ वकील मुकूल रोहतगी यांना सांगितले. त्यावर रोहतगी म्हणाले की, ‘काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी १० एप्रिलच्या राफेल निकालाबाबत चुकीचे वक्तव्य केल्याचे मान्य केले आहे. राफेलबाबत निकालात काही विशिष्ट कागदपत्रे विचारात घेऊ नये, हे केंद्र सरकारचे म्हणणे न्यायालयाने सकृतदर्शनी फेटाळले होते. राहुल गांधी यांनी प्रचारात उत्साहाच्या भरात हे विधान केल्याचे म्हटले असून त्यांनी दिलगिरी व्यक्त असल्याचे म्हटले आहे, आमच्या मते ही माफी नाही. केवळ तसे केल्याचे दाखवले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश न वाचताच मुख्य राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने ‘चौकीदार नरेंद्र मोदी चोर हैं’ असे विधान केले होते व ते न्यायालयाच्या तोंडी घातले होते.’

अखेर या प्रकरणी राहुल यांना नोटीस बजावण्यात आली असून, ३० एप्रिलला सुनावणी होणार आहे.