शिवराज यादव, रत्नागिरी

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघदेखील चर्चेत आहे. नीलेश राणे आणि विनायक राऊत यांच्यापैकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. वैयक्तिक पातळीवर आरोप-प्रत्यारोप होत असताना कोकणच्या विकासाच्या मुद्द्याकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने हॉटेल व्यवसायिक कौस्तुभ रमेश सावंत यांच्याशी संवाद साधला असता सरकारी उदासीनतेमुळे कोकणाचा विकास रखडला आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

निवडणुकीत कोणत्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे असं विचारला असता त्यांनी खासकरुन रत्नागिरीचा उल्लेख करत अद्यापही रोजगार निर्मितीकडे हवं तितकं लक्ष दिलं जात नसल्याचं सांगितलं. यासोबतच रत्नागिरी एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून विकसित होण्याची क्षमता असतानाही त्याकडेही दुर्लक्ष केलं जात असल्याचं त्यांना सांगितलं. या दोन गोष्टी महत्त्वाच्या असून यामुळे रत्नागिरीचं उत्पन्न वाढू शकतं. पण याकडे दुर्लक्ष केलं जात असून यामागे राजकीय उदासिनता, अनास्था आहे असं त्यांनी सांगितलं.

लोकांनी मतांमधून आपल्या भावना व्यक्त करत राजकारणाला वेगळं वळण देण्याची गरज असून रत्नागिरी आणि सिंधुदूर्गात राजकीय स्थिर नेतृत्व देणं गरजेचं आहे असं मत व्यक्त केलं. राजकीय नेत्यांकडून दिशाभूल केली जात आहे का असं विचारलं असता, नेते दिशाभूल करतात असं म्हणू शकत नाही. आपल्याकडे ज्ञान नसताना ते मिळवणं गरजेचं असून त्यासाठी प्रयत्न होतना दिसत नाही अशी खंत एक कोकणवासीय म्हणून त्यांनी व्यक्त केली. नेते त्यांचा राजकीय अजेंड्याप्रमाणे काम करत असतात असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

पुढे बोलताना त्यांनी नाणार प्रकल्प हद्दपार झाल्यावरुन नाराजी व्यक्त करत नाणार प्रकल्प राजकीय अनास्था आणि लोकांच्या अज्ञानामुळे येथून हद्दपार झाला असंच म्हणावं लागेल असं सांगितलं. जर राजकीय अनास्था दूर झाली असती, राजकीय नेत्यांनी ग्रामस्थांना किती विकास झाला असता तसंच किती मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली असती हे समजावून सांगणं गरजेचं होतं. पण तसं घडलंच नाही, त्यामुळे एक मोठा प्रकल्प हातातून निघून गेला असं म्हटलं.

रत्नागिरी एक पर्यटनस्थळ म्हणून विकसित केलं जाऊ शकतं. आमच्याकडे गणपतीपुळे सारखं प्रसिद्ध देवस्थान आहे. १५ ते २० लाख भाविक दरवर्षी येथे भेट देतात. पण रत्नागिरीला भेट देत नाहीत. रत्नागिरीकडे एक ट्रान्झिस्ट डेस्टिनेशन म्हणून पाहिलं जातं. म्हणजे येथून लोक मालवणला जातात, गपणतीपुळे करुन दापोलीला जातात पण रत्नागिरीत थांबत नाहीत असं सांगताना पर्यटनाच्या दृष्टीने वेगळे प्रयत्न करणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं.

निवडणुकीसंबंधी बोलताना आमच्याकडे खेड्या पाड्यातील मतदार हे फक्त स्थानिक राजकीय नेत्यांकडे पाहून मतदान करतात पण शहराकडील मतदार देशात काय बदल हवेत हे पाहून मतदान करतात. स्थानिक नेते आपल्या ग्रामस्थांना शिक्षित करण्यासाठी प्रयत्न करत नाहीत तसंच बदल व्हावा असंही वाटत नाही, त्याचीच पोळी ते भाजून घेतात असं त्यांनी सांगितलं.

भविष्यात मोठे प्रकल्प आले नाही किंवा विकास झाला नाही तर काय परिणाम होतील असं विचालं असता, ‘येथून लोक स्थलांतरित होत आहेत. आज रत्नागिरी, सिंधुदूर्गमध्ये जो तरुण आहे त्याला चांगलं शिक्षण घेऊन येथेच नोकरी, व्यवसाय करण्याची इच्छा आहे तसं होत नाही आहे. येथे काम न मिळाल्याने मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांत तरुण जात आहेत. यामुळे दुर्दैवाने रत्नागिरी आणि सिंधुदूर्गमध्ये लोकसंख्या कमी होत चालली आहे. भविष्यात आमच्या येथील तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळाला नाही तर हे प्रमाण अजून वाढण्याची शक्यता आहे अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.