संजय पाटील यांचा थेट मतदार संवादावर भर

महायुतीच्या तुलनेत महाआघाडीची पक्ष संघटनात्मक बांधणी कमकुवत असल्याने ईशान्य मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्यापुढे अवघा मतदारसंघ पिंजून काढण्याचे आव्हान आहे. मात्र, याआधी दोनदा लोकसभा निवडणूक लढवण्याचा असलेला अनुभव आणि आमदार असताना निर्माण केलेला जनसंपर्क या जोरावर पाटील हे सध्या घरोघरी फिरून मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर देत आहेत.

दिवसातील १० तास त्या त्या विभागातील प्रमुख कार्यकर्त्यांसोबत तालुका, त्यातील गल्लीबोळ पायी फिरून पिंजून काढण्यावर पाटील यांचा भर दिसला. नुकतेच ते सकाळी दहा वाजण्याच्या आसपास मुलुंडच्या एन एस मार्गावर धडकले. तेथून पायी प्रचारफेरीला सुरुवात झाली. अंबाजी धाम, पाचरस्ता, पी.के. रोड, आर.आर.टी. रोड मार्गे झवेर रोडवरून पुन्हा पीके रोडवर पाटील परतले. या फेरीत मनसे पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसचे प्रवक्ते चरण सिंह सप्रा, उत्तम गीते, बी. के. तिवारी हेही कार्यकर्त्यांसमवेत सहभागी झाले होते. मध्यमवर्गीय वस्तीतून पाटील यांची फेरी रामगड या झोपडपट्टीत शिरली. त्याच दिवशी संध्याकाळी पाटील यांनी घाटकोपरच्या अमृतनगर, भीमनगर, सिद्धार्थनगर या डोंगराळ भागात दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या वस्त्यांमध्ये प्रचार केला.

संपूर्ण प्रचारात पाटील प्रत्येक घरात डोकावत होते, थोरामोठय़ांच्या पाया पडून आशीर्वाद मागत होते. कुठे ताई, मावशी अशी हाक मारून तहान लागल्याचे सांगत हक्काने पाणी मागत होते. मुलुंडच्या रामगड वस्तीतल्या एका घरात वास्तव्यास असलेल्या कुटुंबासह पाटील यांनी दोन घासही घेतले. येथील रहिवाशांनी त्यांच्याकडे वस्तीत शौचालये अपुरी असल्याचे लक्षात आणून दिले. निवडून आलो किंवा पडलो तरी ही समस्या मार्गी लावेन, असे आश्वासन देत पाटील पुढे निघाले. प्रत्येक वस्तीतले प्रश्न त्यांनी ऐकून घेतले.

विद्यमान खासदारांनी गेल्या निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत, येथील पायाभूत सुविधांसोबत रखडलेल्या झोपु योजनांचा प्रश्न आदी महत्त्वाच्या विषयांकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याची आठवण पाटील यांचे कार्यकर्ते मतदारांना करून देत होते. विद्यमान सरकारच्या धोरणांमुळे छोटय़ा व्यावसायिकांची परिस्थिती सांगत होते. यंदा विचार करून मतदान करा, असे आर्जव करत होते.