भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक असलेल्या शिवसेनेने पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमधील ४२ पैकी १५ जागा लढवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. पश्चिम बंगालमधून शिवसेना प्रथमच संसदीय निवडणूक लढवत आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

कोलकात्ता दक्षिण, जाधवपूर, बासरहात, बारासात, डमडम बांकुरा, पुरुलिया, मिदानपूर, कांथी, मालदा उत्तर, बिरभूम, बोलपूर आणि मुर्शिदाबाद या मतदारसंघातून हिंदू उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या बंगाल युनिटचे सरचिटणीस अशोक सरकार यांनी भाजपाच्या नेतृत्वावार टीका केली आहे.

भाजपाने प्रतिम डागाळलेल्या तृणमुल काँग्रेसच्या नेत्यांना उमेदवारी दिली आहे. भाजपामध्ये प्रवेश केलेल्या तृणमुल नेत्यांवर शारदा आणि नारादा प्रकरणाचे आरोप आहेत. मुकूल रॉय आणि संकुदेब पांडा या दोघांची सीबीआयने चौकशी केली आहे असे अशोक सरकार यांनी सांगितले.

भाजपाला हिंदुत्वामुळे सत्ता मिळाली पण आता ते उद्देशापासून भरकटले आहेत. त्यांना हिंदुंची अजिबात चिंता नाही. बंगालमध्ये हिंदुत्व वाचवण्यासाठी आमची लढाई आहे. आमची बंगालमध्ये भाजपा आणि तृणमुल दोघांविरोधात लढाई आहे असे अशोक सरकार यांनी सांगितले. २०१६ सालच्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने १८ जागा लढवल्या होत्या.