भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गांधीनगरमध्ये हजेरी लावल्याने विरोधी पक्षांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली असतानाच या टीकेवर शिवसेनेने सोमवारी प्रत्युत्तर दिले आहे. अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज भरणे हेच तेथे जाण्यामागे एकमेव कारण नव्हते, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा महामेळावा यानिमित्ताने झाला. आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन राष्ट्रीय लोकशाही आघाडीची ताकद दाखवून दिली. महाराष्ट्र ज्यांच्या पाठीशी उभा राहतो त्याच ‘मिशन शक्ती’तून देशाला नवी प्रेरणा मिळते. भगव्याची ज्यांना ‘ऍलर्जी’ आहे, त्यांच्या पोटात दुखणारच, असा टोला शिवसेनेने विरोधकांना लगावला आहे.

अमित शाह यांनी दोन दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी गांधीनगरमधून उमेदवारी अर्ज भरला. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह ‘रालोआ’तील अन्य घटकपक्षांचे नेतेही गांधीनगरमध्ये गेले होते. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीवरुन राज्यात विरोधी पक्षांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेने विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.

अमित शाह यांच्या खास निमंत्रणावरून आम्ही गांधीनगरात गेलो. त्यानिमित्त राष्ट्रीय लोकशाही आघाडीची ‘वज्रमूठ’ दाखवणे हा मुख्य हेतू होता. त्याचा परिणाम असा झाला की, काँग्रेस-राष्ट्रवादी कोल्ह्यांच्या पोटात दुखू लागले आहे. या कळा गर्भारपणाच्या नसून वांझोटेपणाच्या आहेत. कळा इतक्या पराकोटीच्या आहेत की, जनता त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया केल्याशिवाय राहणार नाही, असे अग्रलेखात म्हटले आहे.

सर्व कटुता विसरून आम्ही महाराष्ट्र व देशहितासाठी एकत्र आलो. हिंदुत्वासाठी, देशहितासाठी आम्ही एकत्र आल्याने विरोधकांच्या तोंडात जाणारा लोण्याचा गोळा खाली पडला हे त्यांचे खरे दुःख आहे.अजित पवार, धनंजय मुंडे, अशोक चव्हाण आदी नेत्यांनी आमचा गांधीनगर दौरा हा फितुरी असल्याचे म्हटले आहे. पण शिवसेना-भाजपा या दोन हिंदुत्ववादी विचार असलेल्या पक्षांतील कटुता मिटली ही फितुरी आहे असे कुणास वाटत असेल तर त्यांच्या डोक्याचा अजहर मसुदी खिमा झाला आहे किंवा जैश-ए-मोहम्मदच्या अड्डय़ांवर बसून हे लोक रोज ‘ढोसत’ असावेत, अशी बोचरी टीका शिवसेनेने केली आहे.

आम्ही पुन्हा ‘युती’ केली हा आमचा व महाराष्ट्राच्या जनतेचा प्रश्न आहे. तुम्ही तोंडाची डबडी वाजवायचे कारण काय? आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर द्यायला बांधील आहोत व त्या जनतेच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही हा निर्णय घेतला, असे शिवसेनेने स्पष्ट केले.