सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप

सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वांचा त्यांचेच नातू प्रकाश आंबेडकर यांनी ‘एमआयएम’सारख्या कट्टर जात्यंध पक्षाशी हातमिळवणी करत खून केल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केला.

सोलापुरात शिंदे यांच्या विरोधात भाजपबरोबरच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आव्हान उभे केल्याच्या पाश्र्वभूमीवर शिंदे यांनी ही टीका केली. ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला राज्य घटना देताना तीन वर्षे त्या घटना समितीमध्ये भाषणे करताना हा देश धर्मनिरपेक्षच व्हायला पाहिजे, हे संपूर्ण जगाला पटवून दिले होते. परंतु त्याच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाने ‘एमआयएम’सारख्या कट्टर जातीयवादी शक्तीला साथ दिली आणि डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या धर्मनिरपेक्षतेचा खूनच केला. यात दुसरी कडी म्हणजे माकपसारखा पक्षही जातीयवादी शक्तीबरोबर कसा गेला, हे गौडबंगालच आहे. शेवटी हे भाजपने उभे केलेले पिल्लू आहे, असा दाट संशय वाटतो. हे पिल्लू धर्मनिरपेक्ष विचारांची मते खातोय, असा टोलाही शिंदे यांनी मारला.

लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसबरोबर आघाडी करायचीच नव्हती, याची खात्री पटल्याचे नमूद करताना ते म्हणाले, राज्यात काँग्रेसने आपल्या वाटय़ाला आलेल्या २२ जागांपैकी ४ जागा आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीसाठी सोडण्याची तयारी दर्शविली होती. परंतु त्यांनी २२ जागा मागितल्या.

म्हणजेच त्यांना आघाडीच करायची नव्हती हे पटते. ही आपली शेवटचीच निवडणूक आहे. यापुढे लोकसभा किंवा विधानसभेची एकही निवडणूक लढविणार नाही, असेही शिंदे यांनी या वेळी सांगितले.

विधानसभेवेळी राज ठाकरेंसोबत आघाडीबाबत अनिश्चितता

लोकसभा निवडणुकीत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी स्वत:चे उमेदवार उभे न करता केंद्रातील मोदी सरकारच्या अपयशी कारभाराचा पाढा वाचल्याने त्याचा अप्रत्यक्ष फायदा आघाडीला होत असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्याबरोबर जागा वाटपासाठी समझोता करणार किंवा कसे हे आताच सांगता येणार नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचे कौतुक केले. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्याशी समझोता करण्याबाबत मत व्यक्त करण्यास नकार दिला. धर्मनिरपेक्ष विचारांची जोपासना करणाऱ्या समविचारी पक्षांबरोबर निवडणूक समझोता होऊ शकतो, असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारने घटनात्मक संस्था खिळखिळ्या करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभा निवडणुकीत केवळ सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्याने निवडणूक आयोगाला राजकीय दबाव झुगारून काहीसा पारदर्शक कारभार करता आला, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.