अकोल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेपूर्वीच जोरदार वाऱ्यामुळे सभा मंडप कोसळल्याचे वृत्त आहे. सभेला खूपच कमी वेळ शिल्लक असल्याने आता ही सभा होईल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अकोल्यात दुपारी ३ वाजता मुख्यमंत्र्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र, तत्पूर्वी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जोरदार वारा सुटल्याने मंडपाचा मोठा भाग खाली कोसळला. या दुर्घटनेत कोणालाही इजा झालेली नाही. मात्र, सभेला काही काळच उरलेला असताना मंडप कोसळल्याने भाजपा कार्यकर्त्यांचा चांगलाच गोंधळ उडाला आहे.

अकोल्यात सध्या प्रचंड ऊन असल्याने गर्दीसाठी मंडप टाकणे आवश्यक होते. त्यातच आता तो कोसळल्याने इतक्या उन्हात लोक सभेला गर्दी करतील की नाही याबाबत कार्यकर्ते साशंक आहेत. त्याचबरोबर दुपारी तीनच्या सभेपर्यंत पुन्हा हा मंडप उभारणे मोठे आव्हान असल्याने ही सभाच रद्द होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.