प्रभू रामचंद्र फक्त भाजपाचे नाहीत भाजपाने फक्त प्रभू रामचंद्रांच्या नावे राजकारण केलं अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. जय श्रीराम ही भाजपाने राजकीय घोषणा बनवली. रामकृष्ण परमहंस हे फक्त कालीमातेचे भक्त नव्हते तर रामाचेही भक्त होते असेही उदाहरण ममता बॅनर्जींनी दिले आहे. प्रभू राम हे फक्त भाजपाचे नाहीत असंही त्या म्हटल्या आहेत. सोमवारीच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मी जय श्रीराम म्हणणारच हिंमत असेल तर ममता बॅनर्जींनी अटक करून दाखवावी असं आव्हान दिलं होतं. त्याच टीकेला आज ममता बॅनर्जी यांनी उत्तर दिलं आहे.

लोकसभा निवडणुकीचा सातवा टप्पा होणे बाकी आहे. १९ मे रोजी हा टप्पा पार पडल्यानंतर वेध लागणार आहेत ते निकालाचे. २३ मे रोजी काय होणार याची उत्सुकता कायम आहे. अशात आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगताना दिसत आहेत. जेवढ्या त्वेषाने राहुल गांधी आणि प्रियंका गांधी टीका करत आहेत तेवढ्याच त्वेषाने ममता बॅनर्जीही मोदींवर आणि भाजपावर निशाणा साधत आहेत. ममतादीदींनी बंगालमध्ये जय श्रीरामचा नारा देण्यास मनाई केली आहे. जो असा नारा देईल त्याला तुरुंगात टाकण्याचं त्यांचं धोरण आहे. म्हणूनच मी आता घोषणा देतो हिंमत असल्यास ममतादीदींनी मला तुरुंगात धाडावं असं आव्हान अमित शाह यांनी दिलं होतं. त्याच टीकेला आज ममता बॅनर्जींनी उत्तर दिलं आहे.

रामकृष्ण परमहंस यांचा दाखला देत त्या म्हटल्या रामकृष्ण परमहंस हे फक्त कालीमातेचेच नाही तर श्रीरामाचेही भक्त होते. भाजपाने कायमच जय श्रीरामचा नारा राजकारणासाठी वापरला. प्रभू रामचंद्र हे काही फक्त भाजपाचे नाहीत असेही ममता बॅनर्जी म्हटल्या. आता ममता बॅनर्जी यांनी जो टोला लगावला त्यावर भाजपा काही म्हणणार का हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.