राज ठाकरे यांच्या सभांचा खर्च कोणत्या उमेदवारांच्या खर्चात दाखवायचा हे निवडणूक आयोगाने सांगावे म्हणून शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकांसाठी एकही उमेदवार उभा केलेला नाही. असं असतानाही ते प्रचारसभा घेत आहेत. या प्रचारसभा कोणासाठी आहेत? या सभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खर्चात धरायचा हे विचारणारे एक पत्र विनोद तावडेंनी निवडणूक आयोगाला लिहिले आहे.

राज ठाकरेंच्या जाहीर प्रचारसभा कुणासाठी आहेत आणि त्याचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खर्चात दाखवायचा हे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट करावे अशी मागणी करणारे पत्र तावडे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांना लिहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करून राहुल गांधी यांना निवडून द्या असे आवाहन राज ठाकरे त्यांच्या भाषणांमधून करत आहेत. हा प्रचार प्रत्यक्षपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या उमेदवारांचा होत आहे. या सभांचा खर्च कोणताही उमेदवार त्यांच्या प्रचार खर्चात दाखवत नाही. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे हा खर्च दाखवला गेला पाहिजे. प्रचारसभांमध्ये राज ठाकरे कोणत्याच उमेदवाराचे नाव घेत नाहीत. मग तो खर्च संबंधित उमेदवाराच्या खात्यात कसा दाखवायचा असाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो. मात्र राज ठाकरे करत असलेला प्रचार राजकीय आहे. राहुल गांधी, शरद पवार यांच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठीच आहे. त्यामउळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी त्यांच्या प्रचारसभांच्या खर्चात या सभांचा खर्च दाखवणे गरजेचे आहे असे मत तावडे यांनी पत्रातून मांडले आहे.