बालाकोटमधल्या एअर स्ट्राइकचे श्रेय माझं नसून सैन्याचं आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘में भी चौकीदार’ कार्यक्रमात सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममधून ‘में भी चौकीदार’ मोहिमेला पाठिंबा देणाऱ्यांबरोबर संवाद साधला. माझा सैन्यावर विश्वास होता. त्यांच्या क्षमतेवर, शिस्तीवर विश्वास आहे म्हणून मी बालकोटमध्ये कारवाईचा निर्णय घेऊ शकलो असे मोदींनी सांगितले.

आपल्याला जगाची बरोबरी करायची आहे. आपण भारत-पाकिस्तानमध्ये भरपूर वेळ वाया घालवला. पाकिस्तान आपल्या कर्माने मरेल त्यांना सोडून द्या. आपण पुढे जाऊया असे मोदी म्हणाले.

आपण मागच्या ४० वर्षांपासून दहशतवादाची झळ सोसत होतो. ते कोण आहेत, कुठे आहेत हे सर्व आपल्याला माहित होते. ते मुंबईला आले आणि निघून गेले. त्यामुळे जिकडून दहशतवाद कंट्रोल होतो तिथेच मी हा खेळ खेळण्याचा निर्णय घेतला असे मोदींनी सांगितले.

निवडणुकीत मी व्यस्त असल्यामुळे मोदी काही करणार नाही असे पाकिस्तानला वाटले. पण बालकोटमधल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तान घटनास्थळाजवळ कोणाला जाऊ देत नव्हता. आता आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानने तिथून ढिगारा आणि मृतदेह हलवले आहेत.

बालकोटमधल्या हल्ल्याने पाकिस्तानची कोंडी झाली आहे. बालकोटमध्ये कारवाई झाल्याचे कबूल केले तर तिथे दहशतवादी तळ होता हे पाकिस्तानला मान्य करावे लागेल. म्हणून काही घडलेच नाही असे ते दाखवत आहेत. आम्ही अशा ठिकाणी हल्ला केला की, पाकिस्तान आता जास्तकाळ लपू शकत नाही. गेल्या दीड महिन्यापासून त्यांनी कोणालाही घटनास्थळी जाऊ दिलेले नाही असे मोदींनी सांगितले. निवडणुका आहेत म्हणून मी थांबणार नाही. निवडणूक नाही देश माझी प्राथमिकता आहे. माझा द्वेरष करताना काही लोक पाकिस्तानला मदत करत आहेत हे दुर्देव आहे असे मोदी म्हणाले.