मावळ, शिरूरच्या निकालाची उत्कंठा शिगेला

मावळ आणि शिरूर लोकसभेच्या चुरशीच्या निवडणुकीत कोण विजयी होणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. मावळात महायुतीचे श्रीरंग बारणे की राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांच्यात कोण बाजी मारणार त्याचप्रमाणे, शिरूर लोकसभेतून शिवाजीराव आढळराव खासदारकीचा ‘चौकार’ मारणार की पदार्पणातच डॉ. अमोल कोल्हे ‘जायन्ट किलर’ ठरणार, याविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादीचे प्रभावक्षेत्र असूनही मावळ आणि शिरूर मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार सातत्याने निवडून येत आहेत. भाजपशी असलेली युती हे त्याचे प्रमुख कारण मानले जाते. मावळमध्ये सलग दोन वेळा तर शिरूरमध्ये सलग तीन वेळा शिवसेनेचा खासदार निवडून आला आहे. यंदाही दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात थेट सामना आहे. या हक्काच्या जागा राखण्यासाठी शिवसेनेने तर त्या आपल्याकडे खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादीने पूर्ण ताकद लावली होती. प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाल्या. मावळात शेवटच्या टप्प्यात प्रचाराची पातळी खालावली होती. तर, शिरूरमध्ये दोन्हींकडून एकमेकांना लक्ष्य करण्याची संधी सोडण्यात आली नाही.

मावळात अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना राष्ट्रवादीने िरगणात उतरवून चुरस निर्माण केली. पवार कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष मावळच्या लढतीकडे लागले होते. शिवसेनेचे श्रीरंग बारणे दुसऱ्यांदा लोकसभेच्या िरगणात होते. तर, पार्थ आयुष्यातील पहिल्या निवडणुकीला सामोरे गेले. सुमारे २३ लाख मतदारसंख्या असलेल्या मावळसाठी ५९.४९ टक्के मतदान झाले. बारणे आणि पवार यांच्या मुख्य लढतीत वंचित आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील किती मते घेतात, यावर मावळच्या विजयाचे बरेचसे गणित अवलंबून असणार आहे.

शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीने दरवेळी नवीन उमेदवाराचा प्रयोग करून पाहिला. यंदाही ‘कोरी पाटी’ असलेल्या अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. त्यासाठी माजी आमदार विलास लांडे यांची निश्चित झालेली उमेदवारी रद्द करण्यात आली. नेहमी एकतर्फी होणाऱ्या शिरूरमध्ये यावेळी चुरशीची लढत दिसून आली. शिरूरमध्ये २२ लाख मतदार असून ५९.४६ टक्के मतदान झाले आहे. आढळराव आतापर्यंत चढत्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत.

विजयी होण्याचे सर्वाचेच दावे

मावळ आणि शिरूरमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीमुळे निकालाबाबत तीव्र उत्सुकता आहे. दोन्हीकडील मुख्य उमेदवार तसेच त्यांच्या प्रचारप्रमुखांना विजयी होण्याचा विश्वास वाटतो आहे. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव पुन्हा मोठय़ा मताधिक्याने विजयी होतील, असा दावा  केला आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात पार्थ आणि डॉ. कोल्हे पदार्पणातच विजयी ठरतील, अशी खात्री व्यक्त केली जात आहे.