विकासकामांच्या जोरावर निवडून येणार!

राजन विचारे, शिवसेना

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात लोकांना उपयुक्त ठरतील अशी कोणती ठळक कामे केलीत?

कळवा-ऐरोली दरम्यान नवीन उपनगरीय कॉरिडॉर ऐलिव्हेटेड लिंक हा माझा सर्वात पहिला प्रकल्प आहे. लोकसभेच्या पहिल्या भाषणात या प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित केला होता. प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. नवीन ठाणे रेल्वे स्थानक हा दुसरा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. याला केंद्र शासनाकडून आणि राज्य शासनाकडून परवानगी मिळाली आहे. ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाअंतर्गत केंद्र शासानाकडून निधी मिळाला असून अचारसंहितेनंतर लगेचच कामाला सुरुवात होणार आहे. आमदार असताना ठाणे शहरासाठी मेट्रो प्रकल्पासाठी पाठपुरावा केला होता. या प्रकल्पाचेही काम शहरात सुरू झाले आहे. ठाणे शहरातील अंतर्गत मेट्रो प्रकल्पालाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ‘एमएमआरडीए’ने परवानगी दिली आहे. गायमुख ते भिवंडी बाह्य़वळण रस्त्यावरील दोन किमीच्या अंतरासाठी भारतीय हवाई दलाकडून परवानगी घेतली असून आता या कामासाठी ‘एमएमआरडीए’कडून निधी मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहे. केंद्राकडून जलवाहतूक प्रकल्पाला परवानगी मिळाली असून असा प्रकल्प राबविणारी ठाणे महापालिका देशातील पहिली ठरली आहे.

मुंबई आणि ठाण्यात वाहतूक आणि रेल्वे समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी तुमच्याकडे काय योजना आहेत?

वाहतुकीच्या उपाययोजनेसाठी गायमुख ते भिवंडी बाह्य़वळण हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. तसेच जलवाहतूक हासुद्धा एक महत्त्वाचा प्रकल्प असून त्याचा फायदा ठाणेकरांना होणार आहे. त्यासोबतच कळवा-ऐरोली एलिव्हेटेड मार्ग आणि नवीन ठाणे रेल्वे स्थानक यामुळे ठाणे स्थानकाचा भार कमी होणार आहे.

तुम्हालाच लोकांनी मते का द्यावीत?

गेल्या पाच वर्षांच्या कामाचा अहवाल लोकांसमोर मांडला आहे. खासदार निधीही लोकोपयोगी कामांसाठी वापरला आहे. नवी मुंबई विमानतळ, कल्याण-नवी मुंबईला जोडणारा उड्डाण पूल, सीवूड ते उरण रेल्वे मार्ग यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावले आहेत. तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शहरात वेगवेळ्या योजना आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ठाणेकर नागरिक सुज्ञ आहेत. त्यामुळे आम्ही विकासाच्या कामावर निवडून येत आहोत.

पुढील पाच वर्षे कोणती कामे करणार?

ठाण्यातील मेट्रो प्रकल्प, नवीन ठाणे स्थानक आणि जलवाहतूक हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देईन. तसेच नवी मुंबईतील भूमिपुत्रांचे प्रश्न, त्यांना जागेचा मोबदला मिळवून देणे आणि अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देईन.

रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे प्रश्न सोडविणार!

आनंद परांजपे,  राष्ट्रवादी

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या पाच वर्षांत खासदारांच्या कामगिरीविषयी काय वाटते?

गेल्या पाच वर्षांत ठाणे शहरात सांगण्यासारखे एकही काम खासदारांनी केलेले नाही. मतदारसंघातील मूलभूत प्रश्न सोडवणे हे खासदाराचे महत्त्वाचे काम असते. मग तो वाहतुकीचा प्रश्न असेल किंवा रेल्वेचा प्रश्न असेल किंवा केंद्रातून मोठा एखादा निधी आणून काम करणे असेल. असे कोणतेही विकासाचे मोठे काम त्यांच्याकडून झालेले नाही. खासदार निधी पूर्ण वापरून केलेली कामे म्हणजे विकासाची कामे होत नाही. ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर भागात रेल्वेचे अनेक प्रश्न आहेत. नव्या ठाणे रेल्वे स्थानकाच्या उभारणीसाठी जागेच्या उपलब्धतेचा प्रश्न सत्ताधारी म्हणून शिवसेना-भाजपला सोडविता आलेला नाही. घोडबंदर, कोपरी, कळवा असे शहरातील वेगवेगळे भाग वाहनकोंडीत सापडले आहेत. शहरातील नौपाडा भागात जो उड्डाणपूल उभारला गेला त्याची खरोखरच आवश्यकता होती का, असा प्रश्न पडतो.

मुंबई आणि ठाण्यातील वाहतूक आणि रेल्वे समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी तुमच्याकडे काय योजना आहेत?

ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदरचे रेल्वेचे प्रश्न मोठे आहेत. प्रामुख्याने भाईंदरवरून सुटणाऱ्या रेल्वेच्या फेऱ्या वाढवणे. नवीन ठाणे रेल्वे स्थानकाचा प्रश्न मार्गी लावणे. ट्रान्स हर्बरवरील नवी मुंबईच्या दिशेकडील रेल्वे फेऱ्या वाढवणे या तीन रेल्वे प्रश्नांकडे प्रामुख्याने लक्ष देणार आहे. रेल्वेच्या प्रश्नांविषयी, प्रवाशांविषयी सतत जागरूक असणारा खासदार त्यांना हवा आहे. माझी पुर्वीची कारकीर्द पाहिल्यास मी या प्रश्नांविषयी सजग होतो, आहे. त्यासोबतच कोपरी उड्डाणपूल आणि फाउंटन हॉटेलजवळील उड्डाणपुलाला गती देणे ही महत्त्वाची कामे मार्गी लावण्याकडे लक्ष देणार आहे. तसेच दहीसर ते वसईपर्यंतच्या कोस्टल रोडचा प्रश्नही मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

तुम्हालाच लोकांनी मते का द्यावीत?

ठाण्याचा खासदार हा लोकसभेत लोकांचे प्रश्न मांडणारा असावा आणि सोडवणारा असावा अशी ठाणेकरांची अपेक्षा आहे. मला ठाणे शहरातील प्रश्नांची जाण आहे. तसेच हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठीचा आराखडा माझ्याकडे तयार आहे. याच मुद्दय़ावर ठाणेकरांना मतदान करण्याचे आवाहन करत आहे.

पुढील पाच वर्षे कोणती कामे करणार?

रेल्वेचे प्रश्न सोडवणे आणि मेट्रोच्या कामाला प्राधान्य देणे याकडे माझा विशेष कल असेल. तसेच मेट्रो सेवा दहीसर ते मीरा रोड आणि मीरा रोड ते गायमुख अशी जोडण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासोबतच मतदारसंघात पायाभूत सुविधा सुधारण्यासाठीचे प्रकल्प करण्यावर माझा भर असेल. ज्यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे प्रश्न सुटू शकतील.