महाराष्ट्रातल्या राजकारणात ठाकरे घराणं हे अत्यंत चर्चेतलं घराणं राहिलं आहे. ठाकरे आणि पवार हे महाराष्ट्रातल्या राजकारणातले ब्रांड आहेत असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे. ठाकरेंच्या चार पिढ्या राजकारणात आहेत. तसंच बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे राज ठाकरे आणि त्यांचा मुलगा अमित ठाकरे हेदेखील राजकारणात आहेत. शिवराळ भाषा ही ठाकरेंची खासियत. त्याला ठाकरी भाषा असंही म्हटलं गेलं आहे. तरीही आदित्य ठाकरे शिव्या देत नाहीत. भाषणात आणि वैयक्तिक आयुष्यातही ते शिव्या देत नाहीत. यामागचं कारण त्यांनी सांगितलं आहे.
तेजस ठाकरेंचा राजकारणाचा अभ्यास चांगला
“तेजस माझा लहान भाऊ आहे. तो पक्षी निरीक्षण, प्राणी निरीक्षण करत असतो पण त्याचा राजकारणाचा अभ्यास चांगला आहे. आमच्याकडे तो जेव्हा बातमी देतो तेव्हा तो पश्चिम घाटांमध्ये फिरत असतो तिथली भौगोलिक दृष्ट्या अभ्यास करतो. गावांमधून खरी बातमी मिळते. त्याला राजकारणात रस आहे, त्याचं वाचन, निरीक्षण खूप चांगलं आहे.” असंही आदित्य ठाकरेंनी सांगितलं. ‘विषय खोल’ला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरेंनी हे भाष्य केलं आहे.
हे पण वाचा- Lok Sabha Election 2024: आदित्य ठाकरेंची भाजपावर टीका; म्हणाले “..२०० जागा…”
कार चालवण्याच्या टेस्टचा किस्सा
मी जेव्हा कार शिकत होतो तेव्हा माझ्या वडिलांनी (उद्धव ठाकरे) मला सांगितलं की एक महिना नाही तर तीन महिने कार चालवायला शिक. पण टेस्ट द्यायची आहे हे विसरु नकोस. त्यामुळे मी जेव्हा कार चालक म्हणून टेस्ट द्यायला गेलो तेव्हा पोलीस मला म्हणाले की तुम्ही कार चालवूनच आला आहात तर टेस्ट कशाला देता? त्यावर मी त्यांना म्हटलं मला घरी जाऊन बाबांना उत्तर द्यायचं आहे की मी टेस्ट दिली. त्यामुळे जी काही टेस्ट द्यायची आहे ती सांगा. त्यानंतर मी टेस्ट दिली अशीही आठवण आदित्य ठाकरेंनी सांगितली.
आदित्य ठाकरेंनी सांगितलं शिव्या न देण्याचं कारण
आदित्य ठाकरेंना विचारण्यात आलं की तुम्हाला कधी शिव्या देताना पाहिलेलं नाही. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, “मी खूप लहान होतो, मला वाटतं ज्युनिअर केजीमध्ये होतो. त्यावेळी मी शिवी दिली होती, कारण अवतीभवतीचं वातावरण घरातलं आणि बाहेरचं हे तसंच होतं. मुंबईतली भाषा तशी असते. त्यामुळे काही शब्द तुम्ही उचलताच. ते माझ्याकडूनही झालं. तेव्हा मला आईने (रश्मी ठाकरे) सांगितलं की हे शब्द परत तुझ्या तोंडून बाहेर आले नाही पाहिजेत. त्यानंतर मला परत कधी तसं वाटलंच नाही. माझे मित्र मला चिडवतात तू ज्यादिवशी शिवी देशील ज्या माणसाला त्याने तो त्याचा बहुमान समजला पाहिजे.” असं उत्तर आदित्य ठाकरेंनी सांगितलं.