कोल्हापूर : कोल्हापूरच्या युवक-युवतींमध्ये गुणवत्तेची कमतरता नाही. ते उच्च विद्याविभूषित असूनही त्यांना शिक्षणाच्या तुलनेत रोजगार उपलब्ध होत नसल्याने महानगरांमध्ये धाव घ्यावी लागते. कोल्हापूरचे हे चित्र बदलण्यासाठी तुम्ही आम्हाला खासदार द्या आम्ही तुम्हाला रोजगारांसह स्थैर्य मिळवून देऊ , अशी साद युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथील युवावर्गाला घातली.
युवावर्गामध्ये मतदानाचे महत्त्व जागृत करण्यासाठी ‘आदित्य संवाद’ या उपक्रमाचे युवासेनेच्या वतीने येथील एस. एम. लोहिया हायस्कूल, मैदानावर आयोजन करण्यात आले. आदित्य ठाकरे यांनी या तरुणाईला ‘हाऊ इज द जोश?’ म्हणत दिलेल्या हाकेला तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
संवाद अंतर्गत ठाकरे यांनी ‘देशात एकीकडे परिपूर्ण दृष्टिकोन असलेले शिवसेना-भाजपचे सरकार तर दुसरीकडे ६० वर्षांत देशाचे वाटोळे करणारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ५६ पक्षांची आघाडी आहे. तुम्हाला देशात काय हवे? शिवसेना-भाजप की काँग्रेस-राष्ट्रवादी? असा थेट प्रश्न विचारताच तरुणांनी ‘शिवसेना-भाजप’ असा प्रतिसाद दिला.
कोल्हापुरातील युवक-युवतीच्या रोजगाराबाबत कोणत्या उपाययोजना करणे शक्य आहे? या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, कोल्हापूरची दळणवळण व्यवस्था मर्यादित स्वरुपात राहिली आहे. कोल्हापूरचा औद्योगिक विकास करण्यासाठी व युवावर्गाला रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी येथील विमानसेवेमध्ये आमूलाग्र बदल होणे आवश्यक आहे. शिवसेना-भाजप युतीकडून देशाचा विकास झपाटय़ाने सुरु आहे. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक विजयी होणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला खासदार द्या, आम्ही तुम्हाला रोजगार देऊ , असे त्यांनी आश्वस्त केले.
शिवसेनेचे कोल्हापूर संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, दुर्गेश लिंग्रस, हर्षल सुर्वे, मंजीत माने,अंबरीश घाटगे, ऋतुराज क्षीरसागर, वीरेंद्र मंडलिक, देवराज नरके उपस्थित होते.