१९७८ मध्ये वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडण्यापासून ते आतापर्यंतच्या शरद पवारांच्या राजकीय खेळींवर अजित पवार यांनी टीका केली आहे. शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आणि आम्ही करतो ती गद्दारी कशी काय? असा प्रश्न अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापुढे उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करून अजित पवार यांनी वेगळा गट बनवला आहे. या गटाला निवडणूक आयोगाने मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यतादेखील दिली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दोन्ही गटांमध्ये मोठा संघर्ष चालू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातत्याने शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. आज (२ मे) पुन्हा एकदा अजित पवार यांनी शरद पवारांना टोला लगावला. तसेच शरद पवार यांनी गेल्या पाच दशकांमध्ये केलेल्या राजकीय खेळींवरून त्यांच्यासमोर काही प्रश्न उपस्थित कले आहेत.
अजित पवार म्हणाले, १९७८ साली महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे लोकप्रिय नेते वसंतदादा पाटील यांचं सरकार होतं. हे सरकार उत्तम पद्धतीने राज्याचा कारभार पाहत होतं. परंतु, यांनी (शरद पवार) वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडलं. त्यानंतर शरद पवारांनी पुलोदला घेऊन म्हणजेच, जनता पक्षाशी युती करून राज्यात सरकार बनवलं. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवार यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांचं काही ऐकलं नाही. ज्या यशवंतरावांनी शरद पवारांना राजकारणात संधी दिली, त्याच यशवंतरावांचं शरद पवारांनी काहीच ऐकलं नाही.
२०१४ सालीसुद्धा असाच एक प्रकार घडला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मी पुण्यावरून मुंबईला निघालो होतो. मी मुंबईला पोहोचण्यापूर्वीच टीव्हीवर एक बातमी झळकली. प्रफुल्ल पटेल यांनी सिल्व्हर ओकच्या (शरद पवार यांचं निवासस्थान) बाहेर येऊन प्रसारमाध्यमांशी बातचीत केली आणि त्यावेळी पटेल यांनी सांगितलं की, आमचा भाजपाला बाहेरून पाठिंबा आहे. त्यावेळी शरद पवारांनी भाजपाला बाहेरून पाठिंबा दिला. मी मुंबईला येऊन विचारलं की हे कसं झालं? तर त्यावर ते (शरद पवार) म्हणाले, ही स्ट्रॅटेजी आहे. आताच्या घटनेनंतर मला प्रश्न पडतो की, ते करतात ती स्ट्रॅटेजी आणि आम्ही करतो ती गद्दारी? मी केलं तर ते वाट्टोळं?
उपमुख्यमंत्री म्हणाले, १९९५ ला आमचं सरकार गेलं तेव्हा छगन भुजबळ यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली आणि हे (शरद पवार) दिल्लीला गेले. ते दिल्लीला गेल्यानंतर प्रचाराची सर्व यंत्रणा आम्ही पाहत होतो. त्या काळी कुठेही अडचण येऊ दिली नाही. त्या काळात सर्व जिल्हा परिषदा, जिल्हा बँका, जिल्हा दूधसंघ, सर्व संस्था या शरद पवारांबरोबर कशा राहतील याची आम्ही काळजी घेतली. कार्यकर्ते कसे आमच्याबरोबर राहतील हेदेखील पाहिलं, नीरा भीमा सहकारी साखर कारखाना किंवा इंदापूरचा कारखाना हे दोन अपवाद वगळता सर्वत्र नीट जम बसवला.
सोनिया गांधींवर टीका, नवा पक्ष आणि पुन्हा काँग्रेसबरोबर आघाडी
त्यानंतर १९९९ मध्ये यांनी (शरद पवार) एक नवीन मुद्दा काढला, सोनिया गांधी परदेशी आहेत, त्यानंतर काही घटना घडल्या आणि मग पक्षातून काढलं… मग आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळी सर्वांनी शरद पवारांना साथ दिली. पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, छगन भुजबळ, मधुकर पिचड, प्रफुल पटेल आणि राज्यातल्या जनतेने आम्हाला साथ दिली. तुम्ही (जनता) सगळं काही पाहत होता. जून १९९९ ला आम्ही काँग्रेसपासून विभक्त होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला आणि पाच महिन्यांनी म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात शरद पवार आम्हाला म्हणाले, आपण आता काँग्रेसबरोबर जायचं. म्हणजे तो जुना ‘परकीय’ मुद्दा काढला होता तो यांनी मध्येच सोडून दिला. आम्ही यावर काहीच बोलू शकलो नाही. कारण ते आमचे दैवत होते, वडिलांसमान होते, ते म्हणतील तीच आमच्यासाठी पूर्व दिशा होती. त्यांच्या या बदलणाऱ्या भूमिका मी पाहत होतो. हे पाहता पाहता माझे काळ्याचे पांढरे (केस) झाले. आता जे काळे केस दिसतायेत ते मी कलप केलेत.
हे ही वाचा >> पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसला तीन आव्हानं; म्हणाले, “युवराजांमध्ये हिंमत असेल तर…”
“…अन् आम्ही जास्त आमदार असूनही मुख्यमंत्रीपद सोडलं”
अजित पवार म्हणाले, १९९९ ला आम्ही काँग्रेसबरोबर सरकार बनवलं. तर २००४ च्या निवडणुकीत आमचे काँग्रेसपेक्षा जास्त आमदार निवडून आले होते. तेव्हा विलासराव देशमुख मला म्हणाले, ‘तुमचे मुख्यमंत्री कोण होणार आहेत? छगन भुजबळ, आर. आर. पाटील की तुम्ही स्वतः मुख्यमंत्री होणार? कारण आम्हाला मॅडमने (सोनिया गांधी) सांगितलं आहे की मुख्यमंत्री पदावर दावा करण्याचा आपल्याला कुठलाही अधिकार नाही. उपमुख्यमंत्री कोणाला करायचं ते आपण ठरवू.’ परंतु. शरद पवारांनी काही दिवसांत आम्हाला सांगितलं की आपण मुख्यमंत्रीपद सोडून देऊया. त्या बदल्यात चार मंत्रीपदं जास्त घेऊ. आपल्याला मुख्यमंत्रीपद नको. मी म्हटलं हे सगळं कठीणच झालंय. पण शरद पवारांचा आदेश आम्ही ऐकला. त्यांच्या आदेशांवर कधीही आक्षेप घेतला नाही. मला कधी कधी वाटतं आत्ता जो निर्णय घेतलाय तो मी २००४ सालीच घ्यायला पाहिजे होता.