जून २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते आणि तत्कालीन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्षाशी बंडखोरी करून पक्षातील ४१ आमदारांना बरोबर घेत वेगळा गट बनवला. या गटासह ते राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून शपथ घेतली. तर त्यांच्या गटातील इतर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांच्या गटाने आम्हीच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा केला. त्यामुळे हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेलं. निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या गटाला मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिली. तसेच त्यांना पक्षाचं घड्याळ हे निवडणूक चिन्ह देखील बहाल केलं. पक्षाचे दोन गट झाल्यापासून दोन्ही गटांमधील नेते सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अजित पवार तर थेट पक्षाचे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. अजित पवार यांनी आज (२ मे) पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला.

अजित पवार म्हणाले, आम्ही २००४ मध्ये काँग्रेसबरोबर आघाडी करून विधानसभा निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत जनतेने आमच्या बाजूने कौल दिला. तसेच विधानसभेला आमचे आमदार काँग्रेसपेक्षा जास्त होते. त्यामुळे काँग्रेसचे राज्यातील वरिष्ठ नेते विलासराव देशमुख यांनी मला विचारलं, “तुमचे मुख्यमंत्री कोण होणार आहेत? छगन भुजबळ, आर. आर. पाटील की तुम्ही स्वतः मुख्यमंत्री होणार? कारण आम्हाला सोनिया गांधी यांनी सांगितलं आहे की मुख्यमंत्री पदावर दावा करण्याचा आपल्याला (काँग्रेसला) कोणताही अधिकार नाही. उपमुख्यमंत्री कोणाला करायचं ते आपण ठरवू.” त्यानंतर आमच्या पक्षात मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा होईल वाटत असतानाच शरद पवारांनी आम्हाला सांगितलं की आपण मुख्यमंत्रिपद सोडून देऊया. त्या बदल्यात चार मंत्रिपदं जास्त घेऊ. आपल्याला मुख्यमंत्रिपद नको आहे. ते ऐकून मी मनाशीच म्हटलं हे सगळं कठीणच झालंय. परंतु, शरद पवारांचा आदेश आम्ही ऐकला. त्यांच्या आदेशांवर कधीही आक्षेप घेतला नाही. आम्ही कधी हूं की चू केलं नाही. आता मला वाटतंय की, आता केलंय ते २००४ लाच केलं असतं तर लय बरं झालं असतं.

हे ही वाचा >> “मी करतो ते वाट्टोळं आणि तुम्ही…”, अजित पवारांचा शरद पवारांना टोला; ‘त्या’ घडामोडींचा दाखला देत म्हणाले…

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाबरोबरची युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करून सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली होती. तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठका चालू होत्या. त्याचवेळी अजित पवार यांनी भाजपाबरोबर हातमिळवणी करून आपल्याला राष्ट्रवादीच्या आमदारांचा पाठिंबा आहे असं सांगत देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर पहाटे शपथविधी उरकला होता. यावरून अजित पवारांवर नेहमी टीका होते. या टीकेलाही अजित पवार यांनी उत्तर दिलं. अजित पवार म्हणाले, “२०१९ ला आमच्या भाजपाबरोबर पाच ते सहा बैठका झाल्या होत्या. या बैठकांमध्ये भाजपाबरोबर जायचं ठरलं होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि मी उपमुख्यमंत्री होणार हेदेखील ठरलं होतं. कुणाला कुठली खाती? पालकमंत्री कोण? याबाबतही निर्णय झाला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मला तेव्हा बाजूला घेतलं आणि म्हणाले हे बघ अजित आम्हाला यापूर्वी तुमचा काही चांगला अनुभव नाही. तुझ्यादेखत जसं ठरलंय तसं तुला वागावं लागेल. मी त्यांना शब्द दिला होता. मी तसंच वागेन असं सांगितलं होतं. मी त्यांना शब्द दिला. इतकं सगळं ठरल्यानंतर मी मागे कशाला फिरु?