मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यातील विधानसभेचे निकाल हाती येत आहेत. सध्या तेलंगणा वगळता इतर तीन राज्यात भाजपा आघाडीवर असून काँग्रेस पिछाडीवर आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे विद्यमान सरकार कोसळते की काय? अशी परिस्थिती असताना आता काँग्रेसमधूनच पक्षावर टीका होऊ लागली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पक्षाला घरचा आहेर दिला असून सनातन धर्मावर टीका करून काँग्रेसने चूक केली, असा टोला लगावला आहे.
हे वाचा >> छत्तीसगडमध्ये फासे पालटले, काँग्रेसला धोबीपछाड देत भाजपा विजयाच्या दिशेनं
एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधताना आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले, “हा काँग्रेसचा पराभव नाही. हा डाव्या विचारसरणीचा पराभव आहे. मागच्या काही दिवसांपासून डाव्या विचारांचे लोक काँग्रेसमध्ये शिरले आहेत. काँग्रेसच्या अनेक निर्णयांवर या डाव्या नेत्यांनी प्रभाव टाकलेला आहे. हे काही नेते काँग्रेसला महात्मा गांधींच्या रस्त्यावरून हटवून वामपंथी मार्गावर नेत आहेत. काँग्रेस पक्ष महात्मा गांधींच्या विचारांवर मार्गक्रमण करत इथपर्यंत पोहोचला आहे. महात्मा गांधींच्या सभेची सुरुवात ‘रघुपती राघव राजाराम, पतीत पावन सीताराम’ या ओळींनी व्हायची. आज त्या काँग्रेसला सनातन धर्माच्या विरोधतला पक्ष म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. हे दुर्दैवी आहे. काँग्रेसने अशा वामपंथी नेत्यांना वेळीच बाजूला केले नाही तर काँग्रेसचे अवस्था लवकरच एमआयएम या पक्षासारखी होईल.”
“काँग्रेसच्या नेतृत्वाला यावर गंभीरपणे विचार करावा लागेल. काँग्रेसला महात्मा गांधी, पंडीत नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची काँग्रेस राहू द्यावे लागेल. काँग्रेसला मार्क्सच्या विचारांवर जे नेते नेऊ पाहत आहेत. त्यांना लवकर बाजूला करावे लागेल”, असे आचार्य कृष्णम म्हणाले.
आणखी वाचा >> मध्य प्रदेशमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमताचा कल, मोदी-शाहांच्या रणनीतीचा उल्लेख करत शिवराज सिंह म्हणाले…
सनातन धर्माने काँग्रेसला बुडवले
आचार्य कृष्णम पुढे म्हणाले, “भारत भावनाप्रधान देश आहे. सनातन धर्माचा विरोधामुळे आमचा पक्ष बुडाला. जातीवादाच्या राजकारणाला या देशाने कधीही स्वीकारले नाही. ६ सप्टेंबर १९९० रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी संसदेत भाषण केले. ते एकदा सर्वांनी ऐकले पाहीजे. हा देश जर जातीयवादी असता तर माजी पंतप्रधान व्हिपी सिंह यांना घरोघरी पुजले गेले असते. त्यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी करून जातीचे कार्ड खेळले. त्यांच्यापेक्षा मोठा जातीवादी नाही. पण त्यांची अवस्था काय झाली? हे देशाने पाहिले. आम्ही सनातन धर्माचा विरोध केल्यामुळे पराभूत झालो, हे तथ्य आहे.”
ज्या राज्यात काँग्रेसचा पराभव झाला आहे, त्या राज्यातील प्रभारींनी त्वरीत राजीनामा द्यावा. जर त्यांच्यात लाज उरली असेल तर त्यांनी स्वतःहून तात्काळ राजीनामा दिला पाहीजे. काँग्रेसला सनातनचा शाप लागला, असाही आरोप आचार्य कृष्णम यांनी केला.