अमरावती लोकसभा मतदारसंघामधून महायुतीकडून नवनीत राणा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात महाविका आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर येथूनच बच्चू कडू यांनी दिनेश बुब यांना उमेदवारी दिलेली आहे. सध्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असल्याने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आता नवनीत राणा यांच्यावर आमदार बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली आहे. “नवनीत राणा यांच्या पराभवामध्ये सर्वात मोठा हातभार रवी राणा यांचा असेल”, असा पलटवार बच्चू कडू यांनी केला आहे.
बच्चू कडू नेमके काय म्हणाले?
रवी राणा यांनी दोन दिवसांपूर्वी प्रहारचे उमेदवार दिनेश बूब यांच्यावर टीका करत ते रात्री जुगार खेळतात, दारु पितात, अशी टीका केली होती. आता त्यांच्या या टीकेला बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बच्चू कडू म्हणाले, “रवी राणा यांनी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करु नये. ज्याचं घर मातीचं असतं, त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगडं मारु नये. आम्ही जर चित्रपटातील सीन काढले तर पिताना दिसतात. त्याचे समाज मनावर काय परिणाम होतात ते पाहिलं पाहिजे. रवी राणा यांनी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ नये. शेवटचे चार ते पाच दिवस राहिले आहेत. आम्ही जर खोलात हात टाकायला गेलो तर अडचण होईल”, असा थेट इशारा बच्चू कडू यांनी रवी राणा यांना दिला.
quiziframe id=30 dheight=282px mheight=417px
बच्चू कडूंनी फडणवीसांचे मानले आभार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नवीत राणा यांच्या प्रचारासाठी अमरावतीमध्ये आले होते. यावेळी बोलताना त्यांनी बच्चू कडू यांचे आणि त्यांच्या पक्षाचे नाव घेतले नाही. यासंदर्भात बोलताना बच्चू कडू म्हणाले, “आम्ही देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. त्यांनी आमचं नाव घेतलं असतं तर अधिक संभ्रम निर्माण झाला असता. याचा अर्थ ते आमच्या बाजूने आहेत, ही आमची जमेची बाजू आहे.”
बच्चू कडू पुढे म्हणाले, “नवनीत राणा यांना पाडण्यासाठी सर्वात मोठा हातभार कोणाचा असेल तर तो रवी राणांचा आहे. त्यांची जी भाषा आहे आणि ते व्यवस्थित वागले असते तर ही वेळ आली नसती. पण आता नवनीत राणा यांना निवडणुकीमध्ये पाडण्याचे श्रेय रवी राणा यांना जाईल”, असा पलटवार बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्यावर केला.