आज दिवसभरातला चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे चार राज्यांमधले निवडणूक निकाल. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपाने बाजी मारली आहे. तेलंगणात केसीआर यांची सत्ता गेली आहे आणि ते राज्य काँग्रेसने जिंकलं आहे. या संदर्भात विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशात छत्तीसगडच्या एका जागेची चर्चाही रंगली आहे. साजा या विधानसभा मतदारसंघातून ईश्वर साहू हे विजयी झाले आहेत. आत्तापर्यंत सातवेळा आमदार झालेल्या रवींद्र चौबे या काँग्रेस उमेदवाराचा त्यांनी पराभव केला आहे. इश्वर साहू यांचा मुलगा दंगलीत मारला गेला होता. ज्यानंतर भाजपाने ईश्वर साहू यांना तिकिट दिलं. भाजपाचा हिंदुत्वाचा हा प्रयोग यशस्वी झाल्याची चर्चा रंगली आहे.
ईश्वर साहू यांना कशी मिळाली उमेदवारी?
भाजपाने छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी जी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली त्यात ईश्वर साहू या शेतकरी उमेदवाराचं नाव सगळ्यांनाच चकीत करणारं होतं. ईश्वर साहू यांचा मुलगा भुवनेश्वर साहू हा बेमतेरातल्या बिरनपूर या ठिकाणी झालेल्या दंगलीत मारला गेला होता. त्यानंतर छत्तीसगडच्या निवडणुकीत ईश्वर साहू यांना तिकिट देऊन भाजपाने मोठा डाव खेळला होता, जो यशस्वी झाला आहे.
केंद्रीय निवडणूक समितीची जी बैठक झाली त्यात भुवनेश्वर साहूचे वडील ईश्वर साहू यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. तिकिट मिळाल्यानंतर ईश्वर साहू म्हणाले होते की आज मी इतका दुःखात असताना, माझा मुलगा मारला गेल्याचं दुःख सहन करत असताना भाजपाने मला साथ दिली आहे. मला भाजपाने साजा या मतदार संघातून तिकिट दिलं आहे. असं म्हटलं होतं.
भुवनेश्वर साहूची हत्या कशी झाली?
६ एप्रिल २०२३ या दिवशी बेमेतरा जिल्ह्यातल्या बिरनपूर गावात दोन गट भिडले होते. या घटनेत भुवनेश्वर साहूची हत्या झाली. ज्यानंतर दंगल भडकली होती. ही दंगल आटोक्यात आणण्यासाठी गावात कलम १४४ ही लागू करावं लागलं होतं. त्यानंतर गावात अनेक दिवस हिंसाचार धुमसत होता. यानंतर छत्तीसगडची निवडणूक लागली तेव्हा ईश्वर साहू यांना तिकिट देण्यात आलं.
सातवेळा आमदार झालेल्या रवींद्र चौबेंचा पराभव
साजा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने सात वेळा आमदार झालेलेल्या रवींद्र चौबेंना उमेदवारी दिली होती. भुपेश बघेल यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्रीही होते. आता ईश्वर साहूंनी त्यांना हरवलं आहे. त्यामुळे छत्तीसगडच्या या जागेची चर्चा चांगलीच होते आहे.
साजा मतदारसंघात ईश्वर साहू यांना ९८ हजार ७५१ मतं पडली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या रवींद्र चौबेंना ९२ हजार ९८६ मतं पडली आहेत. ईश्वर साहू यांनी ५ हजार ७६५ मतांनी रवींद्र चौबे यांचा पराभव केला आहे.