लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सध्या सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभांचा धडाका सुरु आहे. या प्रचाराच्यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. असे असतानाच काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी एका सभेत बोलताना केलेल्या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

“तृणमूल काँग्रेसला मत देण्याचा अर्थ हा भाजपाला मत देणं असा आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसला मत देण्यापेक्षा भाजपाला मत द्या, असे विधान अधीर रंजन चौधरी यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. अधीर रंजन चौधरी यांच्या या विधानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यावर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया देताना आपण अधीर रंजन चौधरी यांच्या विधानाचा व्हिडीओ पाहिला नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : “उद्या जर नरेंद्र मोदीचं निधन…” कर्नाटकमधील काँग्रेस आमदाराचे खळबळजनक विधान

अधीर रंजन चौधरी यांनी एका प्रचाराच्या सभेत बंगाली भाषेत बोलताना हे विधान केले. ते म्हणाले, “ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. यामध्ये काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा विजय गरजेचा आहे. मात्र, जर असे झाले नाही तर धर्मनिरपेक्षता धोक्यात येईल. तृणमूल काँग्रेसला मत देणं म्हणजे भाजपाला मत देणं होय, त्यामुळे भाजपाला मतदान करणे चांगले”, असे अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अधीर रंजन चौधरी यांनी केलेल्या विधानानंतर त्यांच्या लक्षात येताच सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते म्हणाले की, म्हणजे भाजपा आणि तृणमूल काँग्रेसलाही मते देऊ नका. चौधरी यांच्या या विधानानंतर तृणमूल काँग्रेसनेही प्रतिक्रिया देत अधीर रंजन चौधरी हेच भाजपाची बी टीम असल्याचा हल्लाबोल केला. तसेच अधीर रंजन चौधरी हे आता भाजपाचा आवाज बनले असल्याचा टोलाही तृणमूल काँग्रेसने लगावला.