कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान पार पडलं. भाजपा, काँग्रेस, जनता दल ( धर्मनिपेक्षक ) यांच्यात प्रमूख लढत झाली होती. आज ( १३ मे ) मतमोजणी सुरु आहे. या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर दिसत आहे. तर, भाजपा आणि जनता दलाला अपेक्षित अशी आघाडी मिळत नसल्याचं आकडेवारीवरून कळत आहे. यावर आता महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“सध्या बॅलेटमध्ये सुशिक्षितांचं मतदान आहे. परिवर्तन सुरू होत आहे. यावेळी जवळपास ४५ टक्के मतदान काँग्रेसला होणार आहे. त्यामुळे काँग्रेस बहुमताचं सरकार स्थापन करेल. मागच्यावेळी काँग्रेसला जनतेने कौल दिला आणि त्याचाच फायदा घेऊन मोदी सरकारने जनतेच्या कौलाविरोधात जाऊन सरकार स्थापन केलं. भाजपा लोकशाही न मानणारा पक्ष आहे. त्यामुळे यंदा जनतेने काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिलं आहे,” अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

“लिंगायत समाजाला वाळीत टाकण्याचं काम भाजपाने केलं”

“भाजपाच्या सरकारने पाच वर्षात कर्नाटकच्या जनतेवर अत्याचार केले. ४० टक्के कमिशन हा या सरकारचा महत्वाचा भाग होता. ज्या लिंगायत समाजाच्या जोरावर भाजपा सत्तेत आली. त्या समाजाला वाळीत टाकण्याचं काम भाजपाने केलं. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सर्व समाज भाजपाच्या कामकाजावर नाराज होता,” असं नाना पटोले यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“राहुल गांधींच्या नेतृत्वाला देशात मान्यता सुरु”

“राहुल गांधींच्या नेतृत्वात कर्नाटक निवडणुकीचा सर्व प्रचार करण्यात आला. त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. राहुल गांधींच्या नेतृत्वाला देशात मान्यता सुरु झाली आहे. ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी होती. मला ९१ शिव्या दिल्या, असं पंतप्रधानांनी सांगितलं. त्यावर ‘आमच्यावरील शिव्याचं पुस्तक निघेल,’ राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी म्हटलं. त्यानंतर पंतप्रधान नाउत्तर झाले,” असं नाना पटोले म्हणाले.