लोकसभेचा रणसंग्राम सुरु झाला आहे. अशात देशात इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए असा सामना दिसतो आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती एकमेकांच्या विरोधात लढते आहे. आज हनुमान जयंतीचं औचित्य साधत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या गवळीपुरा भागात जाऊन मारुतीचं दर्शन घेतलं. या मंदिरात पूजा आणि आरतीही केली. त्यानंतर माध्यमांशी बोलत असताना विरोधकांवर टीका केली.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“आज हनुमान जयंती आहे, मी आज मारुतीचं दर्शन घेतलं. बजरंगबली सगळ्यांना बुद्धी, शक्ती देतात. त्यामुळे त्यांच्याकडे मी शक्ती मागितली आहे. आपल्या देशावर जी संकटं येतात ती दूर करण्यासाठीही मी प्रार्थना केली तसंच विरोधकांना सुबुद्धी मिळूदे” असंही साकडं मारुतीरायाला घातल्याचं फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरे तोंडाच्या वाफा दवडतात
उद्धव ठाकरेंनी वर्ध्यात भाजपावर टीका केली, पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिलं आहे. याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात महाराष्ट्रात केलेलं एक काम दाखवा. २५ वर्षे मुंबई महापालिका हातात आहे तिथे केलेलं काम दाखवा. तोंडाच्या दवडण्यापलिकडे काही येत नाही.” असं फडणवीस म्हणाले.
हे पण वाचा- “अटकेची शक्यता निर्माण झाल्यावर फडणवीस शिंदेंना म्हणाले, तुम्ही…”, संजय राऊतांचा दावा
पराभवाच्या हताशेमुळे हे सगळे शिवीगाळ करण्यावर उतरले आहेत
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुतिन यांची उपमा दिलीय. त्यावर “हे सर्वच्या सर्व निराश लोक आहेत. पराभवाच्या हताशेने शिवीगाळीवर उतरलेत. तुम्हाला माहितीय, मोदींना जेव्हा जेव्हा शिव्या पडतात, तेव्हा-तेव्हा विजय मोठा असतो. हे जेवढ्या शिव्या देणार, तेवढं लोकं मोदींवर प्रेम करणार” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.