Eknath Shinde Banners In Ayodhya: राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड मोठे यश मिळवले आहे. यामध्ये महायुतीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे राज्यात भाजपाचाच मुख्यमंत्री व्हावा अशी सर्व आमदार आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. असे असले तरी दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी आग्रही असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. विधानसभेचा निकाल लागल्यापासून मुख्यमंत्रीपदाबाबत महायुतीत खलबतं चालू आहेत.

शिंदेंसाठी अयोध्येत बॅनर

महायुतीच्या सत्तावाटपाच्या हालचाली चालू असताना, अयोध्येत एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करा अशा आशयाचे बॅनर झळकत आहेत. सध्या राज्यासह देशभरात या बॅनरची चर्चा सुरू असून, याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

अयोध्येत झळकलेल्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो आहेत. या बॅनरवर लिहिले आहे की, “अयोध्या वासियों की है पुकार… एकनाथ शिंदे बने मुख्यमंत्री फिर एक बार.”

Eknath Shinde Banner in Ayodhya.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करणारा अयोध्येतील बॅनर. (फोटो क्रेडिट-@UmeshBhargav19, X)

हे ही वाचा : एकनाथ शिंदे भाजपावर नाराज? गृहमंत्रीपद मागितल्याची चर्चा, बावनकुळे म्हणाले…

मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटेना

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी २८८ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. त्यानंतर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर झाला. या निकाला बाजी मारत महायुतीने २३४ जागा जिंकल्या. यामध्ये भाजपाच्या वाट्याला सर्वाधिक १३२, शिवसेना (एकनाथ शिंदे) ५७ आणि राष्ट्रवादीला (अजित पवार) ४१ जागांवर विजय मिळवला. निकालाला आता चार दिवस उलटून गेले आहेत. तरीही महायुतीमध्ये सत्तावाटपाचा पेच अजून सुटला नाही. एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

हे ही वाचा : Manisha Waikar : वायकरांभोवती फेरमतमोजणीचा फेरा, लोकसभेनंतर विधानसभेलाही तीच पुनरावृत्ती?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपा-शिवसेनेत नेतृत्त्वासाठी रस्सीखेच

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीतील सर्वच पक्षांनी मुख्यमंत्रीपदावर बोलायचे टाळले होते. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर घेऊ असे ते त्यावेळी म्हणायचे. पण आता भाजपा आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदारवर कार्यकर्ते आमचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा करत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीने (अजित पवार) मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला होकार दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.