लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान आज (२५ मे) पार पडलं आहे. आज देशातील ८ राज्यांमधील एकूण ५८ मतदारसंघांमध्ये मतदान घेण्यात आलं. निवडणूक आयोगाने सायंकाळी ७.४५ वाजता दिलेल्या आकडेवारीनुसार या आठ मतदारसंघांमध्ये ५९.०६ टक्के मतदान झालं आहे. या मतदानाची अंतिम आकडेवारी उद्या किंवा सोमवारी (२७ मे) जाहीर होऊ शकते. देशभरातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट पसरल्यामुळे दुपारच्या सत्रात कमी मतदान झालं. मात्र लोकांनी सकाळी आणि सायंकाळी ४ नंतर मतदान केंद्रांवर रांगा लावून मतदान केलं. सायंकाळी मतदारांमधला उत्साह पाहायला मिळाला. प्रत्येक लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान झालं. यासह जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्येदखील मतदारांचा उत्साह पाहायला मिळाला.

दरम्यान, निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ, आरोप-प्रत्यारोप चालू आहेत. विरोधक निवडणूक आयोगावरही गंभीर आरोप करत आहेत. दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाने मतदानाची आकडेवारी जाहीर न केल्याने त्यांच्या कारभारावर संशय व्यक्त केला जात होता. दरम्यान, निवडणूक आयोगाने मतदानाच्या पहिल्या पाच टप्प्यांमध्ये झालेल्या मतदानाची माहिती जाहीर केली आहे. ही माहिती जाहीर करताना निवडणूक आयोगाने म्हटलं आहे की, मतदानाच्या टक्केवारीवरून लोकांमध्ये गैरसमज पसरवला जात आहे. मतदानाच्या प्रमाणावरून केले जाणारे दावे खोटे आहेत. तसेच मतदानाच्या टक्केवारीत कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही.

निवडणूक आयोगाने पहिल्या दोन टप्प्यांमधील मतदानाची टक्केवारी दोन वेळा जाहीर केली होती. प्रारंभीच्या अहवालात आणि अंतिम टक्केवारीत ५.७५ टक्के मतांचा फरक आढळून येत होता. त्यमुळे आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार महुआ मोइत्रा आणि असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्सने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. मात्र यामध्ये हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला आहेच. अशातच निवडणूक आयोगाने पहिल्या पाच टप्प्यांमधील मतदानाची आकडेवारी जाहीर केली आहे.

हे ही वाचा >> स्वतःची अधुरी प्रेमकहाणी सांगत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून तरुणांना आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन; म्हणाले, “मी महाविद्यालयात…”

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार मतदानाच्या पहिल्या टप्प्यात १६,६३,८६,३४४ मतदारांपैकी ११,००,५२,१०३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याचाच अर्थ पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के मतदान झालं. दुसऱ्या टप्प्यात १५,८६,४५,४८४ पैकी १०,५८,३०,५७२ मतदारांनी मतदान केलं. याचाच अर्थ या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तिसऱ्या टप्प्यात १७,२४,०४,९०७ पैकी ११,३२,३४,६७६ मतदारांनी म्हणजेच ६५.६८ टक्के मतदारांनी मतदान केलं. चौथ्या टप्प्यात १७,७०,७५,६२९ पैकी १२,२६,६९,३१९ मतदारांनी म्हणजेच ६९.१६ टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. तर ८,९५,६७,९७३ पैकी ५,७१,०६,१८० मतदारांनी म्हणजेच ६२.२० टक्के नागरिकांनी मतदान केलं.