शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील काँग्रेस नेत्यांना टोला लगावला आहे. तसेच, आज दुपारी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या जागांबाबत दुपारी पत्रकारपरिषदेत घोषणा होऊ शकते अशी देखील त्यांनी माहिती दिली. याचबरोबर त्यांनी तृणमूल काँग्रेसवर देखील निशाणा साधल्याचे यावेळी दिसून आले.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते प्रफुल पटेल हे गोव्यात आहेत, माझी आताच थोड्यावेळापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. मी देखील गोव्याकडे निघालो आहे, दुपारी आम्ही एकत्र चर्चेसाठी बसतोय आणि तीन वाजता पत्रकारपरिषद होईल. त्यामध्ये आम्ही जाहीर करू की कोण कुठे आणि किती जागा लढणार आहे. गोव्यामध्ये काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा प्रयत्न आम्ही दोन्ही पक्षांनी केला. की, आपण एकत्र काम करावं महाविकास आघाडी जशी महाराष्ट्रात आहे त्याप्रमाणे गोव्यातही करावी. पण बहुतेक ही आघाडी गोव्यातील स्थानिक काँग्रेस नेत्यांना झेपली नाही किंवा पेलली नाही. त्यामुळे आम्ही ठरवलं की त्यांना आपण सत्तेवर येण्यासाठी शुभेच्छा देऊयात आणि शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस दोघांनी मिळून निवडणुका लढवूया. त्यानुसार आम्ही लढत आहोत.”

तसेच, गोव्यात महाविकास आघाडी होत नसल्याचा भाजपाचा फायदा होणार नाही का? या प्रश्नावर बोलताना संजय राऊत यांनी “ मला असं वाटत नाही की प्रत्येक वेळी भाजपाचाच फायदा होईल, असं का वाटावं?. शिवसेना देखील त्यामध्ये आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस हे देखील पक्ष आहेत. जो तो आपल्या ताकदीवर लढत असतो.” असं बोलून दाखवलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचबरोबर, “ आम्हाला माहिती आहे इथे आमची मर्यादा काय आहे. आम्हाला माहिती आहे की आम्हाला काय करायचं आहे. जर तृणमूल काँग्रेस ४० जागा लढवत असेल, तर ते मुख्यमंत्र्यांचा चेहरा समोर आणू शकतात. परंतु ते जे चेहरे समोर आणत आहेत, ते तृणमूलपासून पळून जात आहेत. तसंच आम आदमी पार्टीमध्येही होत आहे.” असं म्हणत संजय राऊत यांनी तृणमूल काँग्रेस व आम आदमी पार्टीवर निशाणा साधल्याचे दिसून आले.