संसदेत राष्ट्रपती यांच्या अभिभाषणावर उत्तर देतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत काँग्रेसला पुन्हा लक्ष्य केलं. विशेषतः गोवा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतांना गोव्याच्या स्वातंत्र्याचा मुद्दा पुढे आणत मोदी यांनी काँग्रेसवर आणि माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांच्या धोरणांवर सडकून टीका केली.

“भारत स्वतंत्र झाल्यानंतर १५ वर्षांनी गोवा मुक्त झाला. सरदार वल्लभाई पटेल यांनी हैद्राबाद, जुनागढसाठी रणनिती बनवली, पावले उचचलली, तशी प्रेरणा घेत गोव्यासाठी रणनिती बनवली असती तर गोव्याला १५ वर्षे गुलामीत रहावं लागलं नसतं” अशी जळजळीत टीका काँग्रेसवर आणि तत्कालीन धोरणांवर केली.

गोवामुक्तीच्या विषयावरुन त्यावेळचे पंतप्रधान पंडित नेहरु यांच्यावर थेट टीका मोदी यांनी केली. तेव्हा प्रसारमाध्यमांमध्ये नेहरुंवर काय टीका केली जात होती याबद्दलचे मुद्दे सभागृहात भाषणामध्ये मोदी यांनी सांगितले. तेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा कशी असेल याची चिंता नेहरु यांना होती, तिथल्या लोकांवर गोळ्या चालवल्या जात होत्या तेव्हा देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं की आम्ही सैन्य पाठवणार नाही. सत्याग्रहींची मदत करण्यास नकार दिला होता. गोव्याबाबत काँग्रेसने केलेला हा अन्याय आहे, यामुळे गोव्याला १५ वर्ष अधिक पारतंत्र्यात रहावं लागलं असे मोदी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान नेहरु लाल किल्ल्यावरुन म्हणाले होते, तिथल्या लोकांनी असं समजू नये की आम्ही सैन्य कारवाई करु. जी लोकं तिकडे जात आहेत त्यांच्याबाबत नेहरु म्हणाले की शुभेच्छा त्यांना. जे स्वतःला सत्याग्राही म्हणत तिकडे जात आहेत त्यांनी नियम पण लक्षात ठेवा, सत्याग्राहींच्या मागे सैन्य येत नाही. काँग्रेसने गोव्याच्या बाबतीत केलेलं गोव्याची जनता हे विसरणार नाही. मंगेशकर कुटुंब हे मुळचे गोव्यातील होते. ह्रदयनाथ मंगेशकर यांना ऑल इंडिया रेडिओमधून काढून टाकलं होतं. का ? तर सावरकर यांचे गाणे म्हंटले म्हणून. हे फक्त मंगेशकर कुटुंबियांसोबत नाही, मजरुह सुल्तानपुरी यांनी सरकारवर टीका केली म्हणून त्यांना एक वर्ष तुरुंगात ठेवले असे मोदी म्हणाले.

पंडित नेहरु आणि त्यांच्या धोरणांवर टीका होत असल्यामुळे आणि याबाबत बोलू दिले जात नसल्यामुळे काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांचा निषेध करत सभात्याग केला.