Gujarat Exit polls Updates, 8 December 2022 : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपाचं सरकार येणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. भाजपाने ऐतिहासिक कामगिरी केली असून १८४ पैकी १५८ जागा जिंकण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेसचा मात्र दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसला फक्त १६ ते २० जागांवर विजय मिळण्याती शक्यता आहे. दुसरीकडे आक्रमक प्रचाराद्वारे मोठी हवा निर्माण केलेल्या ‘आप’ला मात्र तीन ते दोन अंकी आकडा गाठणंही कठीण आहे. बहुमतासाठी ९२ जागा जिंकणं आवश्यक आहे.

या निवडणुकीत भाजपा आपला २००२ मधील १२७ जागांचा तसंच काँग्रेसचा १९८५ मधील १४९ जागांचा रेकॉर्ड मोडण्याच्या मार्गावर आहे. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या या निवडणुकीत मतदारांकडून मिळालेल्या सहानुभूतीमुळे काँग्रेसचा ऐतिहासिक विजय झाला होता.

Priya Dutt
काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त शिवसेनेच्या वाटेवर? मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का?
cm eknath shinde raj thackeray mns
राज ठाकरे महायुतीत सामील होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सूचक विधान; म्हणाले, “योग्य निर्णय…”
women Voters
Lok Sabha Elections 2024 : ‘या’ शहरात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक, मतदान केंद्रांवरही महिला राज!
Tamilisai Soundararajan resigns
तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांचा राजीनामा, भाजपाकडून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता!

एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये भाजपाला १८२ जागांपैकी ११७ ते १५१ जागा आणि काँग्रेससह त्याच्या मित्रपक्षांना १६ ते ५१ जागा मिळतील, असा अंदाज होता.

Live Updates

Gujarat Assembly Election Result 2022 Live Counting Updates : गुजरातमध्ये भाजपाचा ऐतिहासिक विजय, काँग्रेसचा रेकॉर्ड काढला मोडीत

19:59 (IST) 8 Dec 2022
भाजपाचे समर्थन वाढल्याने परिवारवाद आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आक्रोश वाढला - पंतप्रधान मोदी

देशाच्या हितासाठी सर्वात मोठे आणि कठोर निर्णय घेण्याची ताकद भाजपात असल्याने लोकांनी भाजपाला मतदान केलं आहे. भाजपाचे समर्थन वाढल्याने परिवारवाद आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आक्रोश वाढत आहे, असेही ते म्हणाले.

19:43 (IST) 8 Dec 2022
भाजपा आदिवासी बांधवाना सशक्त करण्यासाठी प्रयत्नशील - पंतप्रधान मोदी

भाजपा आदिवासी बांधवाना सशक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळेच आज देशाला पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती मिळाली आहे, असेही ते म्हणाले.

19:41 (IST) 8 Dec 2022
हिमाचल प्रदेशमध्ये विकासासाठी वचनबद्ध - पंतप्रधान मोदी

हिमाचलमध्ये भाजपला एक टक्‍क्‍यांपेक्षा कमी मतांनी सत्तेपासून वंचित ठेवले असले, तरी विकासासाठी आमची वचनबद्धता 100 टक्के असेल, अशी ग्वाही देतो, असेही ते म्हणाले.

19:37 (IST) 8 Dec 2022
भाजपाच्या विकासाच्या राजकारणावर देशातील युवकांचा विश्वास - पंतप्रधान मोदी

केवळ घोषणेसाठी आम्ही घोषणा करत नाही. त्यामागे दृरदृष्टी असते. भाजपाने अनेक चढउतार बघितले. भाजपाच्या विकासाच्या राजकारणावर देशातील युवकांचा विश्वास आहे. आम्ही जातीपातीच्या आधारे राजकारण करत नाही, अशी प्रतिक्रियाही पंतप्रधान मोदी यांनी दिली.

19:23 (IST) 8 Dec 2022
आजच्या विजयातून पुढच्या काळातील चित्र स्पष्ट - पंतप्रधान मोदी

गुजरातमध्ये मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदी यांनी जनतेने आभार मानले आहे. जनतेच्या आशीर्वादामुळेच हा विजय शक्य झाला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच आजच्या विजयातून पुढच्या काळातील चित्र स्पष्ट झाले आहे, असेही ते म्हणाले. दिल्लीतील भाजपा मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

19:07 (IST) 8 Dec 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी बीजेपी मुख्यालयात दाखल

गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात पोहोचून कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.

https://twitter.com/ANI/status/1600844271778926594?s=20&t=TyoilLjCBbB0-aqtknlVQQ

17:59 (IST) 8 Dec 2022
अजित पवारांची भाजपावर टीका

हिमाचल प्रदेश भाजपाध्यक्ष जे पी नड्डांचं राज्य असून तेच त्यांना टिकवता आलेलं नाही अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

17:45 (IST) 8 Dec 2022
कार्यकर्त्यांच्या मेहनतीशिवाय हा ऐतिहासिक विजय शक्य नव्हता - नरेंद्र मोदी

गुजरातमधील ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. "मला गुजरातमधील सर्व मेहनती कार्यकर्त्यांना तुम्ही चॅम्पियन आहात असं सांगायचं आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीशिवाय हा ऐतिहासिक विजय शक्य नव्हता. हे कार्यकर्ताच पक्षाची खरी ताकद आहे," असं नरेंद्र मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

17:05 (IST) 8 Dec 2022
आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता, केजरीवालांनी मानले आभार

आम आदमी पक्षाला स्थापनेनंतर १० वर्षातच राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमधील जनतेचे आभार मानले आहेत. गुजरातमधील जनतेने आपला राष्ट्रीय पक्ष बनवलं असल्याचं ते म्हणाले आहेत.

देशात फार कमी पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता असून, आता त्यात आपचाही समावेश झाला असल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं.

"आपचं दोन राज्यात सरकार असून आज तो राष्ट्रीय पक्ष झाला आहे हे ऐकून लोकांना आश्चर्य वाटतं. गुजरातमधील जनतेने दिलेलं प्रेम, सन्मान याबद्दल मी आभारी आहे. मला फार काही शिकायला मिळालं आहे. गुजरात भाजपाचा गड मानला जात असून तो भेदण्यात आम्हाला यश मिळालं आहे. पुढील वेळी तो जिंकू," असं केजरीवाल म्हणाले आहेत.

16:38 (IST) 8 Dec 2022
काँग्रेसची मतं फुटण्यासाठी भाजपाने आपला निधी पुरवला, सिद्धरमय्या यांचा गंभीर आरोप

गुजरातमधील निकालानंतर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसची मतं फोडण्यासाठी भाजपाने आपला निधी पुरवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

"गुजरातमध्ये आपने खूप पैसा खर्च केला आहे. माझ्या माहितीनुसार, काँग्रेसची मतं फोडण्यासाठी भाजपाने आपला पैसा पुरवला आहे. आपने निवडणूक जिंकल्याने आम्ही मागे पडलो आहोत," असं सिद्धरमय्या म्हणाले आहेत.

16:07 (IST) 8 Dec 2022
उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदी आणि भाजपाचं अभिनंदन

गुजरातमधील विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं अभिनंदन केलं आहे. गुजरातचा विजय विक्रमी आणि ऐतिहासिक असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. "गुजरात निवडणूक पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वात लढवण्यात आली, त्यामुळे जनतेनं भाजपाला भरघोस मतदान केलं," असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

"या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत असे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ तारखेला महाराष्ट्रात येत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते इथेही भरघोस घोषणा करतील अशी अपेक्षा," असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

"आपने गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात मतविभागणी करुन भाजपाचा फायदा घडवून आणला हे स्पष्ट आहे. ज्यांचं त्यांचं राजकारण सोयीनुसार चालत असतं," अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

15:37 (IST) 8 Dec 2022
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गुजरातमध्ये इतिहास"

"भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गुजरातमध्ये इतिहास रचला आहे. आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडून भाजपाने १५७ च्या जवळपास जागा जिंकल्या आहेत. हा ऐतिहासिक आणि अपेक्षित निकाल आहे. २७ वर्षांच्या सत्तेनंतर भाजपा पुन्हा निवडणुकीला सामोरे गेली. विरोधी पक्षांना वाटलं २७ वर्षे सत्तेत राहिल्याने सरकारविरोधी जनमत असेल. मात्र, या निवडणुकीत सरकारच्या बाजूने जनमत असल्याचं मी म्हटलं होतं. ते निकालातून दिसलं," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

15:30 (IST) 8 Dec 2022
गुजरातचा विकास फक्त भाजपाच करु शकतो - देवेंद्र फडणवीस

आम आदमी पक्ष दिल्लीपुरता आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. गुजरातचा विकास फक्त भाजपाच करु शकतो हेदेखील सिद्ध झालं आहे. प्रचारासाठी गेलो होतो तेव्हाच गुजरातचा मूड दिसत होता. प्रत्येक ठिकाणी मोदींच्या नावे घोषणा दिल्या जात होत्या अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

14:48 (IST) 8 Dec 2022
Gujarat Election Results 2022 : भाजपा उमेदवार रिवाबा जडेजा यांचा रोडशो

जामनगरमधील भाजपाच्या उमेदवार रिवाबा जडेजा यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. त्या ५० हजारापेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहे. दरम्यान, त्यांनी जामनगर येथे रोड शो काढत जनतेचे आभार मानले.

https://twitter.com/ANI/status/1600778429099806722?s=20&t=UbEVpnc6Blc2dss1cTkgxg

14:16 (IST) 8 Dec 2022
गुजरातमधील विजयानंतर अमित शाह यांचं ट्वीट

"गुजरातने नेहमीच इतिहास घडवण्याचे काम केले आहे. गेल्या दोन दशकात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने गुजरातमध्ये विकासाचे सर्व विक्रम मोडीत काढले आणि आज गुजरातच्या जनतेने भाजपाला आशीर्वाद देत विजयाचे सर्व विक्रम मोडीत काढले," असं ट्वीट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे.

14:06 (IST) 8 Dec 2022
भाजपाच्या ऐतिहासिक विजयामागे मोदींचं व्हिजन - चंद्रकांत पाटील

"पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिजनमुळे हा विजय मिळाला आहे. भाजपावर विश्वास टाकल्याबद्दल मला राज्याच्या जनतेचे आभार मानायचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही दिवसरात्र मेहनत करु असं आश्वासन आम्ही देतो. विरोधकांनी दिलेली निराधार आश्वासनं आणि तसंच मूर्ख बनवत केलेल्या खोट्या विधानांवर विश्वास न ठेवल्याबद्दली मी जनतेचे आभार मानतो," असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

13:36 (IST) 8 Dec 2022
रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबाचा विजय

भारतीय क्रिकेटर रवींद्र जाडेजाची पत्नी आणि भाजपाची उमेदवार रिवाबाचा जामनगरमधून विजय झाला आहे. "ज्यांनी मला उमेदवार म्हणून स्वीकारलं, माझ्यासाठी काम केलं, जोडले गेले त्या सर्वांचे मी आभार मानते. हा फक्त माझा नवे तर भाजपाचा विजय आहे," असं रिवाबाने सांगितलं आहे.

13:28 (IST) 8 Dec 2022
गुजरात निवडणूक निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “पंतप्रधान मोदी…”

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत झाली. मात्र, निकालात भाजपाला मोठं यश मिळताना दिसत आहे. यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गुजरात निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचं अभिनंदन केलं. ते गुरुवारी (८ डिसेंबर) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

सविस्तर बातमी...

13:15 (IST) 8 Dec 2022
मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांचं सेलिब्रेशन

गुजरातमध्ये ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल सुरु असल्याने मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांनी गांधीनगरमधील भाजपा मुख्यालयात जल्लोष करत आनंद व्यक्त केला. (Express Photos by Nirmal Harindran)

13:09 (IST) 8 Dec 2022
रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा जाडेजाची प्रतिक्रिया

भारतीय क्रिकेटर रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा जाडेजा जामनगरमधून आघाडीवर आहे. "भाजपाने गेल्या २७ वर्षांमध्ये ज्याप्रकारे काम केलं आहे आणि गुजरात मॉडेलची स्थापन केलं आहे ते पाहता जनतेने भाजपासहितच विकासाचा प्रवास पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात नेहमीच भाजपाच्या पाठीशी राहिला असून, यापुढेही राहील," असा विश्वास रिवाबाने व्यक्त केला आहे.

12:41 (IST) 8 Dec 2022
Gujarat Election Results: गुजरातमध्ये भाजपाची सरशी, महिला कार्यकर्त्यांचा जल्लोष!

गांधीनगरमधील भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी गुजरातमधील निवडणुकांतील मोठ्या विजयाकडे वाटचाल करत असताना नाचून विजयाचा आनंद साजरा केला. हाती येणाऱ्या निकलानुसार भाजप 182 पैकी 152 जागांवर आघाडीवर आहे त्यामुळे भाजपा कार्यकर्ते जल्लोषात असल्याचे पाहायला मिळते आहे.

12:23 (IST) 8 Dec 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सी आर पाटील यांचं अभिनंदन

गुजरातमध्ये ऐतिहासिक विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाचे गुजरातमधील प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांचं अभिनंदन केलं आहे. सी आर पाटील यांच्या नेतृत्वात भाजपाने गुजरातमधील निवडणूक लढली असून, रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे.

12:20 (IST) 8 Dec 2022
हा निकाल धक्कादायक आहे, गुजरातच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं विधान

गुजरातमधील निकाल धक्कादायक असल्याचं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकूर यांनी केलं आहे. "गुजरातमध्ये पुन्हा भाजपा सरकारला आणण्याचा जनतेचा निर्णय धक्कादायक आहे. निकाल पाहता आम्ही कोणत्याही बाजूने कमी पडलेलो नाही," असं जगदीश ठाकूर म्हणाले आहेत.

"आम्ही चांगला लढा दिला आहे. पण तरीही आम्ही सरकार स्थापन करु शकलेलो नाही," अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पराभवाचं कारण विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की "यावर आम्ही चर्चा करु. विजय किंवा पराभवाची एक, दोन कारणं नाही आहेत. तसंच भाजपासंबंधी प्रेम आहे असंही नाही".

12:11 (IST) 8 Dec 2022
१० किंवा ११ डिसेंबरला शपथविधी होण्याची शक्यता

गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपाची सत्ता येणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. १० ते ११ डिसेंबरला नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या शपथविधीसाठी हजर राहणार आहेत.

12:03 (IST) 8 Dec 2022
रवींद्र जाडेजाची पत्नी जामनगरमधून आघाडीवर

भारतीय क्रिकेटर रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा भाजपाकडून निवडणूक लढवत असून सध्या आघाडीवर आहे. भाजपाने रिवाबाला जामनगरमधून उमेदवारी दिली आहे. रिवाबा सध्या १८ हजार ९८१ मतांनी आघाडीवर आहे.

12:00 (IST) 8 Dec 2022
गुजरातमध्ये आम्ही खातं उघडलं तरी आम्हाला आनंद होईल- प्रीती मेनन

गुजरातमध्ये आम्ही खातं उघडलं तरी आम्हाला आनंद होईल- प्रीती मेनन

11:57 (IST) 8 Dec 2022
नरेंद्र मोदी संध्याकाळी भाजपा कार्यालयात

नरेंद्र मोदी संध्याकाळी ६ वाजता दिल्लीमधील भाजपा कार्यालयात जाणार. कार्यकर्त्यांना संबोधित करण्याची शक्यता आहे.

11:43 (IST) 8 Dec 2022
गुजरातमध्ये भाजपाकडून जल्लोष

गुजरातमध्ये भाजपाकडून जल्लोष

11:33 (IST) 8 Dec 2022
...हे लोकशाहीसाठी घातक, नाना पटोलेंनी मांडलं स्पष्ट मत

भाजपाकडून राजकारण करत जे धोरण अवलंबलं जात आहे, त्याचं उदाहरण गुजरातमध्ये पाहायला मिळत आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे. मतदानाचा कौल त्यांच्या बाजून आहे, मात्र दबावतंत्र आणि भीतीच्या माध्यमातून हे सर्व झालं आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

आम्ही जिथे कमी पडलो आहोत त्याचं आत्मपरीक्षण करु. पुढील निवडणुकीत आम्ही चांगली कामगिरी करण्याकडे लक्ष देऊ असंही यांनी सांगितलं आहे.

11:22 (IST) 8 Dec 2022
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल विजयी

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल विजयी झाले आहेत. घटलोडियामधून भूपेंद्र पटेल यांनी विजय मिळवला आहे.

11:16 (IST) 8 Dec 2022
भाजपाला ५३.६ टक्के मतं, काँग्रेसला मात्र फक्त २६ टक्के मतं

मतमोजणीला सुरुवात झाली असून तीन तासांनी भाजपा १४९ जागांवर आघाडीवर असून ५३.६ टक्के मतं मिळाली आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस १९ जागांवर आघाडीवर असून फक्त २६.६ टक्के मतं मिळाली आहेत. आपला एकूण १२.८ टक्के मतं मिळाली असून फक्त नऊ जागांवर आघाडी आहे.

10:51 (IST) 8 Dec 2022
चंद्रशेखर बावनकुळे यांनी मानले गुजरातच्या जनतेचे आभार

अमित शाह यांच्या संघटनात्मक कौशल्य आणि जनतेने दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे गुजरातमध्ये भाजपा मोठ्या विजयाकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद मोदींनी भारताला स्वयंपूर्ण करण्याचा, जगातील सर्वोत्तम देश कऱण्याचा प्रयत्न केला असून जनकल्याण योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्या. सरकार आणि संघटनेने केलेल्या कामामुळे हा मोठा विजय मिळाला आहे. मी गुजरातच्या जनतेचे आभार मानतो असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

10:31 (IST) 8 Dec 2022
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा या निवडणुकांशी संबंध जोडू नये - संजय राऊत

दिल्ली महानगरपालिकेत मिळालेल्या यशासाठी मी आपचं अभिनंदन करतो. हिमाचल प्रदेश लहान राज्य असलं तरी तेथे काँग्रेस ज्या पद्धतीने लढते आहे त्यासाठी त्यांचे अभिनंदन करावे लागेल. हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्ता येईल, असंच लोकांना वाटतंय. देशाच्या पुढील निवडणुकींसाठी हे आशादायक चित्र आहे. फक्त विरोधकांनी एकत्र येणं आणि मतविभागणी टाळणं गरजेचं आहे. आपआपसातील मतभेद, हेवेदावे, अंहकार दूर ठेऊन एकत्र लढाई केली तर २०२४ मध्ये देशात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असे हे निकाल आहेत. सगळे एकत्र येऊन लढले तर गुजरातमध्येदेखील लोकसभा निवडणुकीतही परिवर्तन होईल, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा या निवडणुकांशी संबंध जोडू नये असं मला वाटतं. राहुल गांधी वेगळ्या मिशनवर आहेत. या निवडणुकांचा संदर्भ त्यांच्या यात्रेशी जोडणं चुकीचं आहे. गेल्या दोन महिन्यांपासून काँग्रेस अंतर्गत आणि इतर राजकारणापासून राहुल गांधी दूर आहेत. ते एक वेगळी मोहिम पुढे नेत आहेत. देश जोडणं, देशातील द्वेष नष्ट करणं, लोकांची मनं जोडणं, संघर्ष थांबवणं यासाठी ती यात्रा आहे आणि त्याला चांगलं यश मिळत आहे, असंही ते म्हणाले.

10:28 (IST) 8 Dec 2022
आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार गढवी आघाडीवर

आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार गढवी खंबालिया मतदारसंघातून ३२१५ मतांनी आघाडीवर आहेत. दरम्यान भाजपाने मात्र आधीपासूनच जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली आहे.

10:20 (IST) 8 Dec 2022
भाजपा कार्यकर्त्यांकडून सेलिब्रेशनला सुरुवात

भाजपा १४२ जागांवर आघाडीवर असून ऐतिहासिक विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. यानंतर भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात आहे. काँग्रेस २० तर आप सात जागांवर आघाडीवर आहे.

10:16 (IST) 8 Dec 2022
भाजपा ऐतिहासिक विजयाच्या दिशेने, १५० चा आकडा ओलांडण्याची शक्यता

सुरुवातीच्या कलांनुसार, भाजपा १५० चा आकडा ओलांडण्याची शक्यता आहे. भाजपा काँग्रेसचा १९८५ मधील १४९ जागांचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे.

10:07 (IST) 8 Dec 2022
आपनं दिल्ली घेतली, गुजरात भाजपाला सोडलं; संजय राऊतांचा गंभीर आरोप

गुजरातचा निकाल अपेक्षित असून आम आदमी पक्ष आणि भाजपाचं साटंलोटं असल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आपने दिल्ली घेतली आणि गुजरात भाजपासाठी सोडलं असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

10:02 (IST) 8 Dec 2022
Gujrat Elections Result 2022 : भाजपा १२३, काँग्रेस २२ आणि आप १० जागांवर आघाडीवर

https://twitter.com/ANI/status/1600707559434113024

उत्तर जामनगर येथून आप उमेदवार करसनभाई करमूर ४,५८२ मतांनी आघाडीवर, काँग्रेस उमेदवार बिपेंद्रसिंह जडेजा दुसऱ्या क्रमांकावर, तर भाजपाचे रिवादा जडेजा तिसऱ्या क्रमांकावर, मतमोजणी सुरू, आतापर्यंतच्या कलानुसार, भाजपा १२३, काँग्रेस २२ आणि आप १० जागांवर आघाडीवर

09:35 (IST) 8 Dec 2022
गुजरातमध्ये भाजपा ६१ जागांवर, तर काँग्रेस ११ जागांवर आघाडीवर - निवडणूक आयोग

गुजरातमध्ये भाजपा ६१ जागांवर, तर काँग्रेस ११ जागांवर आघाडीवर, निवडणूक आयोगाची माहिती

https://twitter.com/ANI/status/1600700028925882368

09:21 (IST) 8 Dec 2022
हार्दिक पटेल आघाडीवर

काँग्रेसमधून भाजपात प्रवेश कऱणारे हार्दिक पटेल सध्या आघाडीवर आहेत. काँग्रेस नेते लखाभाई भारवाड पिछाडीवर आहेत.

09:16 (IST) 8 Dec 2022
भाजपा सर्व रेकॉर्ड मोडणार, मंत्र्याचा दावा

भाजपाचे सूरत पश्चिममधील उमेदवार पूर्णेश मोदी यांनी भाजपा यावेळी सर्व रेकॉर्ड मोडेल असा विश्वास व्यक्त केला आहे. "भाजपा यावेळी सर्व रेकॉर्ड मोडेल. आम्हाला यावेळी सर्वात जास्त जागा आणि सर्वाधिक मतदानाची टक्केवारी असेल. मोठ्या फरकाने आमचे उमेदवार विजयी होतील," असं ते म्हणाले आहेत.

09:11 (IST) 8 Dec 2022
एक्झिट पोलचे अंदाज काय आहेत?

भाजपा काँग्रेस आप

न्यूज एक्स ११७-१४० ३४-५१  ६-१३  

जन की बात

रिपब्लिक टीव्ही  १२८-१४८ ३०-४२  २-१०  

आज तक   १२९-१५१ १६-३०  ९-२१  

एबीपी सी व्होटर १२८-१४० ३१-४३  ३-११  

टुडेज चाणक्य   १५० १९  ११

एकूण जागा : १८२, बहुमताचा आकडा : ९२

08:53 (IST) 8 Dec 2022
भाजपा आघाडीवर

सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाने मोठी आघाडी घेतली आहे. भाजपा १०० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे काँग्रेस २६ तर आप तीन जागांवर आघाडीवर आहे.

08:49 (IST) 8 Dec 2022
भाजपाचं या पाच मुद्द्यांकडे लक्ष असेल

गुजरातमधील जनता पुन्हा भाजपाला संधी देणार की नव्या पक्षाचं सरकार आणायचं यासंबंधी आज निर्णय देणार आहे. दरम्यान २०२४ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने पाच मुख्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केलं आहे.

१) पाटीदार मत

२) पक्षांतर करणारे उमेदवार

३) डिच्चू देण्यात आलेल्या मंत्र्यांच्या जागा

४) पंतप्रधान मोदींनी प्रचार केलेले मतदारसंघ

५) विकास

08:28 (IST) 8 Dec 2022
मतमोजणीला सुरुवात

गुजरातमध्ये कोणाची सत्ता येणार याकडे सध्या संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. भाजपा सलग सातव्यांदा राज्यात सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करत असताना, आम आदमी पक्षही गुजरातच्या राजकारणात प्रवेश करण्यास उत्सुक आहे.

08:00 (IST) 8 Dec 2022
२०१७ विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा?

भाजपा – ९९ (२०१२ च्या तुलनेत १६ जागा कमी)काँग्रेस – ७७ (२०१२ च्या तुलनेत १६ जागा वाढल्या)अपक्ष – ३ (२०१२ च्या तुलनेत २ जागा वाढल्या)भारतीय ट्रायबल पार्टी – २राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – १

08:00 (IST) 8 Dec 2022
Gujarat Election Results 2022 : गुजरात विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान

गुजरातमध्ये एकूण १८२ विधानसभेच्या जागा आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात १ डिसेंबरला ८९ जागांसाठी मतदान झालं होतं. तसेच सोमवारी (५ डिसेंबर) दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांसाठी मतदान पार पडलं.

07:57 (IST) 8 Dec 2022
Gujarat Election Results 2022 : गुजरात विधानसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार

https://twitter.com/ANI/status/1600663457678131200

गुजरात विधानसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार, मतमोजणी केंद्राजवळ कडेकोट बंदोबस्त, अहमदाबादमधील एलडी इंजिनिअरींग कॉलेजवळील दृश्य

gujrat electionगुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल घोषित होत आहेत. आता गुजरातमध्ये भाजपा, काँग्रेस की आप जिंकणार हे हळूहळू स्पष्ट होत आहे.